– देशाच्या 140 कोटी लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार: केंद्रीय मंत्री अमित शाह
– या देशातील महिला आता केवळ धोरणांमध्ये सहभागी होणार नाहीत तर धोरणे ठरवण्यातही योगदान देतील असा केंद्रीय मंत्री अमीत शाह यांचा विश्वास
– सध्याच्या तरतुदीनुसार मोदी सरकारने संसदेत निवडून येणार्या सदस्यांच्या तीनही श्रेणींमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण
नवी दिल्ली :- केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत नारी शक्ती वंदन विधेयकावरील चर्चेत भाग घेतला. देशाच्या 140 कोटी लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या नारी शक्तीचा खऱ्या अर्थाने सन्मान केल्याबद्दल आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनापासून आभार मानत असल्याचे ते यावेळी म्हणाले.
केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, हे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्यानंतर देशातील महिलांसाठी लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभांमध्ये एक तृतीयांश जागा राखीव राहतील. हे विधेयक मंजूर झाल्यावर महिलांचा आपल्या हक्कांसाठी सुरू असलेला लढा संपुष्टात येणार आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी नुकत्याच झालेल्या जी-20 परिषदेत महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाची संकल्पना जगासमोर मांडली होती, आणि हे विधेयक मंजूर झाल्यावर आता एका नवीन युगाची सुरुवात होईल, कारण यापुढे या देशातील महिला केवळ धोरणांमध्ये सहभागी होणार नाहीत तर धोरणे ठरवण्यातही योगदान देतील.
सामाजिक व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी, महिलांचा सामाजिक सहभाग वाढवण्यासाठी आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने हे विधेयक आणले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री म्हणाले.
सध्याच्या तरतुदीनुसार, मोदी सरकारने संसदेवर निवडून येणाऱ्या सदस्यांच्या सर्वसाधारण (ओबीसी सह), अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तीनही प्रवर्गांमध्ये महिलांना 33 टक्के आरक्षण दिले आहे, असे त्यांनी सांगितले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीयांच्या कल्याणाचे काम मनापासून केले आहे, असेही अमित शहा म्हणाले. 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या पहिल्या भाषणात आपले सरकार दलित, मागासवर्गीय, आदिवासी आणि महिलांचे सरकार आहे असे म्हटले होते ,याची आठवण शहा यांनी यावेळी भाषणामध्ये करुन दिली.