रामटेकवर भाजपचा डोळा असल्याने शिंदे गटात अस्वस्थता

नागपूर :- अयोध्येत श्रीराम मंदिर उभारणीचे श्रेय घेणाऱ्या भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील श्रीरामाच्या रामटेकवरही दावा करणे सुरू केले आहे. शिंदे गटाचे खासदार असतानाही भाजपने ही जागा आपल्याला मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीत ही जागा शिंदे गट लढवणार की भाजपसाठी सोडणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. रामटेक हे विदर्भातील पौराणिक धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. त्याला आध्यात्मिक महत्त्वही आहे. वनवासाच्या काळात श्रीरामाचे येथे वास्तव्य असल्याने या शहराला रामटेक असे नाव पडले, अशी आख्यायिका आहे. रामटेक हा नागपूर ग्रामीणमधील सहा विधानसभा मतदारसंघ मिळून तयार झालेला लोकसभा मतदारसंघ आहे. तो पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता.

माजी पंतप्रधान नरसिंहराव येथून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. मात्र नंतरच्या काळात शिवसेनेने या मतदारसंघावर जम बसवला. १९९९ पासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडून येत आहे. त्याला अपवाद फक्त २००९चा होता. यावेळी येथून काँग्रेसचे मुकुल वासिनक विजयी झाले होते. २०१४ मध्ये सेनेचे कृपाल तुमाने यांनी ही जागा परत काँग्रेसकडून हिसकावून घेतली. २०१९ मध्ये तुमाने दुसऱ्यांदा येथून विजयी झाले. शिवसेनेत फूट पडल्यावर त्यांनी शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. आता २०२४ च्या निवडणुकीची त्यांनी तयारी सुरू केली असली तरी सेनेतील फूट भाजपच्या पत्थ्यावर पडणारी ठरली आहे. आतापर्यत भाजपच्या मदतीने सेनेने येथे विजय मिळवला. आता चित्र वेगळे आहे. सहापैकी फक्त एका विधानसभा मतदारसंघात (रामटेक) शिंदे गटाचा आमदार (आशीष जयस्वाल ) आहे. दोन मतदारसंघात भाजपचे (हिंगणा आणि कामठी) व दोन मतदारसंघात काँग्रेस (सावनेर आणि उमरेड)चे आमदार आहेत. एक विधानसभा मतदारसंघ (काटोल) राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यात भाजपचे वर्चस्व आहे. भाजप-शिवसेना युती असल्यानेच तुमाने यांचा दोन वेळा येथून विजय सुकर झाला. भाजपशिवाय जिंकून येणे अवघड असल्याची जाणीव झाल्यावरच तुमाने यांनी शेवटच्या टप्प्यात ठाकरे यांची साथ सोडून शिंदे यांच्या गटात जाणे पसंत केले.

सुरूवातीपासूनच भाजपचा रामटेकवर डोळा आहे. पण सेनेशी युती असल्याने त्यांची डाळ शिजली नाही. पण आता पक्षाने ही जागा सुटावी म्हणून पूर्ण तागद पणाला लावली आहे. आतापर्यंत शिवसेनेला भाजपची मदत होत आली आता सेनेने मदत करावी, असा मतप्रवाह पक्षात आहे. त्यामुळे शिंदे गट ही जागा लढवणार की भाजपसाठी सोडून विदर्भाबाहेरील जागेसाठी तडजोड करणार हे पाहावे लागणार आहे. चौकट शिवसंकल्पमधून रामटेक वगळल्याने चर्चेला ऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसंकल्प अभियानातून रामटेक वगळण्यात आल्याने शिवसैनिक अस्वस्थ झाले. महायुतीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे आहे. पहिल्या यादीत रामटेकचे नाव होते. ही जागा भाजपला सोडण्यात येत तर नाही ना, या शंकेने शिवसैनिक अस्वस्थ झाले आहेत. खासदार तुमाने यांनी मात्र रामटेकचा समावेश यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकशाहिचा खून करणार्या नार्वेकर चा फोटो जाळुन जोडे मारो आंदोलन

Fri Jan 12 , 2024
नागपूर :- लोकशाहीची हत्या करणा-या विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकरच्या फोटो ला जोडे मारून व जाळून नागपूरच्या संतप्त शिवसैनिकांनी रेशिमबाग चौकात आज तिव्र निषेध केला. रेशिमबाग चौकातील शिवसेना कार्यालयासमोर आज दुपारी नागपूर शहर प्रमुख किशोर कुमेरिया यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले, संतप्त शिवसैनिकांनी निंब का पत्ता कडवा है. ५० खोके राहूल नार्वेकर ओके अश्या घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com