– ऑनलाईन गेमिंगमुळे झाला कर्जबाजारी
– सायबर गुन्हेगाराने लढविली शक्कल
नागपूर :-एका सायबर गुन्हेगाराने कन्फर्म रेल्वे तिकीट उपलब्ध करून देतो, अशी बतावणी केली. प्रवाशांना जाळ्यात ओढले. आयआरसीटीसीच्या अधिकृत अॅपवरून 13 लोकांच्या रेल्वे तिकिटा काढल्या आणि त्यांची तिकिटे परस्पर रद्द करून दोघांना गंडा दिला.
हा खळबळजनक प्रकार नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आला. या प्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला हुडकून काढले. करण यादव (26) रा. वानाडोंगरी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून मोबाईल आणि तिकिटांची रक्कम जप्त करण्यात आली.
कळमना येथील रहिवासी फिर्यादी विजय फुले यांना मुंबईला जायचे होते. 13 जण जाणार असल्याने त्यांनी आधीच तिकिटा काढल्या. जाण्याचे तिकीट कन्फर्म होते. मात्र, परतीच्या तिकिटा कन्फर्म मिळत नसल्याने ते तिकिटा काढण्यासाठी नागपूर स्थानकावर आले. रेल्वेच्या तिकीट केंद्रात असताना आरोपी करण त्यांना भेटला. त्याने कन्फर्म तिकिटा काढून देतो, असे सांगितले आणि फिर्यादीला जाळ्यात ओढले. करणने त्याच्याजवळील मोबाईलने आयआरसीटीसीच्या कन्फर्म तिकिटा अॅपवरून 13 जणांची तिकिटा काढल्या. कन्फर्म तिकिटे मिळाल्याने फिर्यादीचा विश्वास बसला. फिर्यादीने ऑनलाईन 6 हजार 300 रुपये करणला दिले. तिकिटांचा स्क्रीन शॉट घेतल्यानंतर फिर्यादीने तिकिटांची टीसीकडून खात्री करून घेतली. घरी गेल्यावर पीएनआर नंबर तपासले असता तिकिटा रद्द केल्याचे आढळून आले. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक मनीषा काशिद यांच्या मार्गदर्शनात संजय पटले, प्रवीण खवसे, मजहर अली, अमोल हिंगणे यांनी केली.
असे झाले उघड
घरी गेल्यावर फिर्यादीने पीएनआर तपासले असता तिकिटा रद्द झाल्याचे आढळून आले. त्यांनी लागलीच करणला फोन करून माहिती दिली. करणने तो मी नव्हेच अशी भूमिका घेतली. फिर्यादीने पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीची ओळख पटविली. करण दुसर्या सावजाला शोधण्यासाठी स्टेशनवरच होता. पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
कर्ज फेडण्यासाठी लढविली शक्कल
आरोपीचे बी. कॉम.पर्यंत शिक्षण झाले असून, तो सायबर कॅफे चालवायचा. दरम्यान त्याला ऑनलाईन (लुडो) खेळाची सवय लागली. या खेळामुळे तो कर्जबाजारी झाला. कर्ज फेडण्यासाठी त्याने नवी शक्कल लढविली. प्रवासी निश्चित होऊन निघाल्यानंतर परस्पर तिकिटे रद्द करून आर्थिक फसवणूक करायचा.
दूरांतोचे तिकीट केले रद्द
दुसर्या प्रकरणात वेटरनरीचा विद्यार्थी विनेशकुमार कालराम याचीही आर्थिक फसवणूक केली. त्याला अॅपवरून कन्फर्म तिकीट काढून दिले. नंतर तिकीट रद्द करून आरोपीने 1970 रुपये वळते केले.