चंद्रपूर : महानगरपालिकेच्या २०२२ या वर्षात होणाऱ्या निवडणूकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नाविन्यपूर्ण योजनांबरोबरच संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाद्वारे नुकत्याच झालेल्या आभासी बैठकीत करण्यात आले.आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राज्य निवडणूक आयोगाद्वारे राज्यातील सर्व महानगरपालिका अधिकारी आणि जनसंपर्क अधिकाऱ्याची ऑनलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत उपायुक्त अशोक गराटे, सिस्टम मॅनेजर अमूल भुते व जनसंपर्क अधिकारी युधिष्ठिर रैच उपस्थित होते.
महाराष्ट्र निवडणूक आयोगाने नवीन वर्षात स्थानिक स्वराज संस्थांची निवडणूक लक्षात घेता महानगरपालिकेला मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्याचे आवाहन सुद्धा यावेळी केले. राज्य निवडणूक आयोगाचे सहायक आयुक्त यांनी ऑनलाइन बैठकीत राज्यातील महानगरपालिकेच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि जनसंपर्क अधिकाऱ्यांना निर्देशित केले की, महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता जास्त प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. राज्य निवडणूक आयोगाने तृतीयपंथी, दिव्यांगांना सुध्दा मतदानासाठी आवाहन करण्याचे निर्देश दिले. राज्यभरातील सर्व महानगरपालिकांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढील काही महिने महत्वाचे असून सर्व प्रकारच्या मतदारांपर्यंत जनजागृती करण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या वतीने उपायुक्त अशोक गराटे यांनी वेगवेळ्या उपक्रमाची माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, चंद्रपूर मनपातर्फे सोशल मीडियाच्या माध्यमातून ग्राफिक्स आणि व्हिडिओच्या माध्यमाने जनजागृती करण्यात येत आहे. तसेच एसएमएस आणि व्हॉइस कॉल या सिस्टिमच्या माध्यमातून सुद्धा नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले.