– वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांची माहिती
– येतात उशिरा करतात चेन पुलिंग
नागपूर :-प्रत्येक डब्याची तपासणी किंवा प्रत्येक बोगीत सुरक्षा जवान तैनात करता येणे शक्य नाही. मात्र, प्रवाशांना सुरक्षेसंबधी कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची खबरदारी आरपीएफने घेतली आहे. त्यामुळे बिनधास्त प्रवास करा आरपीएफ प्रवाशांच्या सोबतीला आहे. अशी हमी मध्य रेल्वेचे वरिष्ठ सुरक्षा आयुक्त मनोजकुमार यांनी प्रसार माध्यमांना दिली. पदभार स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
मनोजकुमार यांनी दाणापूर, पालघाट, मुराबाद आणि गोहाटी आदी महानगरात काम केले आहे. त्यामुळे नागपूर आणि येथील गुन्हेगारी त्यांच्यासाठी क्षुल्लक आहे. प्रवाशांनी धावत्या रेल्वेत चढू किंवा उतरू नये. रेल्वे रूळ ओलांडून जावू नये. क्षुल्लक कारणांसाठी साखळी ओढून गाडी थांबवू नये अशा सुचना मनोजकुमार यांनी केल्या.
सुरक्षेसंदर्भात माहिती देताना मनोजकुमार म्हणाले प्रवासी आणि रेल्वे संपत्तीची सुरक्षा आरपीएफची जबाबदारी आहे. मेरी सहेली या योजनेअंतर्गत प्रवास करणार्या महिलांची आस्थेने विचारपूस करून त्यांना आस्वस्थ करण्याचे काम आरपीएफ महिला करीत आहेत. प्रवासी महिलेचे मोबाईल नंबर घेवून त्यांच्याशी चर्चा केली जाते. कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास प्रवाशांनी 139 या हेल्प लाईनवर संपर्क साधावा असे आवाहन मनोजकुमार यांनी केले. प्रवाशांना तृतियपंथीयांचा खुप त्रास व्हायचा, आता तृतियपंथीयांवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळविण्यात आरपीएफला यश मिळाले आहे.
नागपूर विभागात 600 किलो मीटरचा रेल्वे मार्ग आहे. 150 पेक्षा अधिक रेल्वे गाड्यांची वर्दळ असते. याशिवाय तिसर्या आणि चवथ्या रेल्वे मार्गाच्या काम युध्द पातळीवर सुरू आहे. अलिकडे मानवी चुका आणि प्राण्यांमुळे आकस्मिक अपघाताचे प्रमाण वाढले आहे. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. मोकाट गाई, म्हशी धावत्या रेल्वे जवळ जात असल्याने अपघात वाढले आहेत. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी रेल्वे रूळाशेजारी राहणार्यांत रेल्वे, प्रवासी आणि वेळेचे महत्व सांगितले जात आहे. या प्रसंगी आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीना उपस्थित होते.
नागपूर विभागात सर्वाधिक चेन पुलिंग
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक चेन पुलिंग होत असल्याची माहिती मनोजकुमार यांनी दिली. नागपूर रेल्वे स्थानकावर सर्वाधिक वेळ गाडी थांबत असल्यानंतरही प्रवासी उशिरा येतात आणि सहकार्यासाठी चेन पुलिंग करून गाडी थांबवितात. अशा प्रवाशांवर रेल्वेच्या कलम 141 नुसार कारवाई करून एक हजार रुपये दंड ठोठावला जातो. क्षुल्लक कारणांसाठी चेन पुलिंग केल्यामुळे रेल्वेचा वेळ व्यर्थ जातो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.