आता वापरा ” विकल्प थैला “
प्लास्टीक पिशवीला मनपाने दिला पर्याय
प्लास्टिक कॅरी बॅग आढळल्यास ५००० रुपये दंड
चंद्रपूर :- राज्यात प्लास्टीक बंदीची अंमलबजावणी सुरू असून, पर्यावरण रक्षणाचा संदेश देणाऱ्या कापडी पिशवी प्लास्टिक कॅरी बॅगला सक्षम पर्याय ठरणार आहेत. आपल्या शहरातील व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीचाच वापर करण्याचा निर्धार केला तर ही कापडी पिशवी प्रत्येक घरात पर्यावरण रक्षणाचा संदेश उत्तमरित्या पोहोचवेल, असा विश्वास आयुक्त विपीन पालीवाल यांनी बैठकीत व्यक्त केला.
आज बाजारात कोणत्याही छोट्या मोठ्या वस्तू खरेदी केल्या की आपसूकच दुकानदार प्लास्टिकची पिशवी देतो किंवा ती आवर्जून मागितली जाते. परिणामी मोठ्या प्रमाणात पर्यावरणाला हानी पोहचत आहे.मनपातर्फे शहरात नियमित स्वच्छता करण्यात येते. मात्र सफाई दरम्यान नालीत, गटारात मिळणाऱ्या प्लास्टिक पन्नीचे प्रमाण फार मोठे आहे. यापुढे प्लास्टिक कॅरी बॅग वापरतांना आढळल्यास ५००० रुपये दंड केला जाणार आहे.
मनपाच्या डम्पिंग यार्ड मध्ये येणाऱ्या कचऱ्यात प्लॅस्टिकच्या वस्तू असल्याने त्याला वेगळे काढणे ही मोठी समस्या आहे. सामान घेण्यासाठी प्रत्येकाने कापडी पिशव्यांचा वापर करायचे ठरवले व व्यापाऱ्यांनी जर कापडी पिशवीच द्यायचे ठरविले तर हा प्रश्न ७० टक्के सुटू (कमी होऊ) शकतो. सगळ्या गोष्टींना पर्याय हा असतोच. कुठला पर्याय निवडायचा हे आपल्या हातात असते. आज प्लास्टीकला नाकारून भविष्य सुखरूप होण्याचा पर्याय निवडण्याचे आवाहन आयुक्त यांनी केले.
चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्लास्टीक पिशवीला विकल्प किंवा पर्याय म्हणुन विकल्प थैला उपलब्ध करून दिला असुन सदर विकल्प थैला म्हणजेच कापडी पिशवी आहे. महीला बचत गटाद्वारे बनविल्या जाणाऱ्या या कापडी पिशवीवर QR कोड उपलब्ध असुन या QR कोडला मोबाईलने स्कॅन करताच कापडी पिशवी मिळण्याच्या ठिकाणांची माहीती मिळते.सदर उपक्रमाचे आज मनपातर्फे उदघाटन करण्यात आले.
इंटरनेट वर vikalpthaila.com या संकेतस्थळावर ( वेबसाईट ) वर जाऊन क्लिक केल्यास किंवा कापडी पिशवीवरील QR कोडला मोबाईलने स्कॅन केल्यास ज्या परीसरातील दुकानातुन विकल्प थैला घ्यायचा असेल तो परीसर निवडण्याचा पर्याय उपलब्ध आहे. दुकानाचा पर्याय निवडतात दुकानासंबंधीत आवश्यक ती माहीती जसे दुकानाचे नाव, गुगल लोकेशन, मोबाईल क्रमांक इत्यादी पाहता येते.
नोंदणी केलेल्या दुकानातुन कापडी पिशवी माफक शुल्क देऊन खरेदी करता येणार आहे. छोटी थैली १० रुपये तर मोठी थैली १५ रुपयांना मिळणार असुन काम पुर्ण झाल्यावर सदर कापडी पिशवी दुकानदारास परत करण्याचाही पर्याय नागरीकांना उपलब्ध असणार आहे. पिशवी परत केल्यास काही अंशी रक्कम दुकानदार ठेऊन उरलेली रक्कम परत करेल अथवा दुकानातुन सामान खरेदी केल्यास त्यावर सुट देईल. दुकानदारांनी या मोहीमेत सहभागी होण्यास रफीक शेख यांच्याशी ९४२३४१६७२६ या क्रमांकावर संपर्क साधावा. सर्व दुकानदार व व्यापारी यानी विकल्प थैला दुकान म्हणून नोंदणी करुण घ्यावी आणी विकल्प थैला ग्राहकांना उपलब्ध करुन द्यावा प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर बंद करावा.
सदर बैठकीस सहायक आयुक्त विद्या पाटील, वैद्यकीय अधिकारी स्वच्छता डॉ. अमोल शेळके, रफीक शेख, डॉ. पालीवाल, डॉ गोपाल मुंदडा, सदानंद खत्री, व्यापारी संघटना, फुटपाथ असोसिएशन, स्वयंसेवी संस्था यांचे प्रतिनिधि व मनपा उपद्रव पथकाचे कर्मचारी उपस्थीत होते.