नागपूर :- सर्वोच्च न्यायालयाच्या सुरक्षा समितीचे सदस्य न्यायमूर्ती (निवृत्त) अभय सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली रस्ते सुरक्षा समितीची बैठक घेण्यात आली. अपघात रोखण्यासाठी उपाययोजनांचा आढावा या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील अपघातप्रवण स्थळे ओळखून अपघात रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असल्याचे परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी येथे सांगितले.
या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, प्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार, आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. पूजा सिंग, वाहतूक विभागाच्या उपायुक्त चेतना तिडके, आदींसह जन आक्रोश या रस्ते सुरक्षा संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेसह अनेक विशेष आमंत्रित सहभागी झाले होते.
सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांनी नागपुरातील रस्ते अपघाताचा आढावा घेतला. यावेळी भिमनवार बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांच्या अध्यक्षतेखाल समिती नियुक्त केली आहे. यासाठी देशभरात २५ संचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये आढावा घेण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपुरात हा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर महिन्यात मुंबईत बैठक घेण्यात आली होती. त्यांनतर नागपुरात बैठक घेत सादरीकरण करण्यात आले. रस्ते अपघात आणि अपघातात होणारे मृत्यू रोखण्यासाठी काय उपाययोजना कराव्या याविषयी सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांनी नागपुरातील अपघातप्रवण क्षेत्रावर काय कार्यवाही करावी याविषयी आढावा घेत निर्देश दिले आहेत. पुन्हा मे महिन्यात आढावा घेण्यात येणार आहे. न्या. सप्रे यांच्या मार्गदर्शनाखाली आढावा घेत त्यांनी दिलेल्या निर्देशाप्रमाणे अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
नागपूर जिल्ह्यातील एकूण लांबीच्या १० टक्के भागावर अपघात होत असतात. त्यावर आम्ही विशेष लक्ष केंद्रीत करणार आहोत. २० ते २२ ठिकाणे आहेत. लवकरच या भागावर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. यामुळे ८५ टक्के अपघात कमी करण्यास मदत होणार असल्याचे भिमनवार पुढे बोलताना म्हणाले.