तंबाखू सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडले ! अनेक आजारात वाढ

यवतमाळ :- तंबाखूच्या सेवनामुळे दातांचे आरोग्य बिघडत असून, पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंड कमी उघडणे, हिरड्यावर सुज येणे, दातांमध्ये इन्फेक्शन वाढणे आदी समस्यांमुळे अनेकजण त्रस्त आहेत. राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ कालावधीत १४ हजार ७१२ जणांची तपासणी केली असता, यात अनेकांच्या दातांना कीड लागल्याचे निदर्शनास आले आहे. काहींना पांढरा चट्टा, लाल चट्टा आणि तोंड न उघडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.

तंबाखू, खर्रा, गुटखा व इतर तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे तपासणी केलेल्यांपैकी बरेच जणांच्या तोंडात पांढरा चट्टा आला आहे. तर काही व्यक्तींचे तोंड उघडत नाही. काही वयस्क व्यक्तींच्या हिरड्यावर सुज आली असल्याचे दिसून आले आहे.

१२५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत शासकीय, निमशासकीय कार्यालय, आरोग्य संस्था येथे पान, सुपारी, गुटखा खाणारे व थुंकणाऱ्यांच्या विरोधात गेल्या वर्षभरात कारवाई करण्यात आली. १ हजार २५१ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला आहे. ही मोहीम अधिक कडक केली जाणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुखदेव राठोड यांनी दिली. तपासणी दरम्यान ११८ संशयित मौखिक कॅन्सर रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहे. त्यामुळे तंबाखूचे व्यसन जीव घेणे आहे.

तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जनजागृती

दिनांक ३१ मे जागतिक तंबाखू विरोधी दिन आहे. या दिनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मौखिक आरोग्य तपासणी, मौखिक आजारांचे निदान, दंतोपचार व तंबाखू सोडविण्यासाठी समुपदेशन केले जाते. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ हे मुख कर्करोगाचे कारण आहे. या व्यसनापासून तरुणांनी व लहान मुलांनी दूर राहिले पाहिजे. त्या अनुषंगाने जनजागृती केली जात असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुखदेव राठोड यांच्यासह मौखिक कार्यक्रमाचे डॉ.सागर भुले राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या जिल्हा सल्लागार डॉ.मनाली बांगडे यांनी सांगितले.

सुगंधी सुपारी तोंडाच्या आरोग्याला हानिकारक आहे. एकूणच शरीराचे आरोग्य बिघडवणारे हे व्यसन आहे. त्यामुळे तत्काळ तंबाखूपासून दूर झाले पाहिजे. किशोरवयीन मुला-मुलींना तंबाखू उद्योगाच्या हस्तक्षेपापासून दूर ठेवले पाहिजे. या अनुषंगाने मुलांचे संरक्षण करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. शाळा, महाविद्यालयांच्या १०० यार्ड परिसरामध्ये तंबाखू विक्रीला बंदी आहे.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मुलांचे शासकीय वसतीगृह नेर येथे मोफत प्रवेश प्रक्रीया सुरु

Wed May 22 , 2024
यवतमाळ :- सामाजिक न्याय विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या मुलांचे शासकीय वसतीगृह नेर नबाबपूर येथे रिक्त जागेवर प्रवेश देण्यासाठी वर्ग 8 वी, 11 वी व बिए, बिकॉम, बिएस्सी प्रथम वर्षाकरिता प्रवेश प्रक्रीया राबविण्यात येत आहे. अनुसुचीत जातीसाठी 80 टक्के, अनुसूचीत जमाती 3 टक्के, विमुक्त जाती, भटक्या जमातीसाठी 5 टक्के, इतर मागासवर्ग 5 टक्के, विशेष मागासप्रवर्गासाठी 3 टक्के, अनाथ 2 टक्के व अपंगासाठी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com