भारतीय वायुदलाच्या सोनेगांव येथील कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक
नागपूर :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ विस्तारीकरणाच्या माध्यमातून येथील औद्योगिक क्षेत्रासह रोजगार निर्मितीला मोठा हातभार लागणार आहे. या विस्तारीकरणात भारतीय वायुदलाकडील जमिनीचा समावेश असल्याने त्यांना हस्तांतरीत केलेल्या नवीन जागेवर स्थलांतरीत होण्यासाठी ज्या काही प्रलंबित बाबी आहेत त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ विपीन इटनकर यांनी दिले.
जिल्हाधिकारी तथा सहव्यवस्थापकीय संचालक, म.वि.वि.कं. मर्या. नागपूर यांनी आज भारतीय वायुदलाच्या सोनेगांव येथील कार्यालयात आज व्यापक बैठक ठेवून आढावा घेतला.
विदर्भाच्या विकासातील एक प्रमुख मापदंड म्हणून ज्याकडे पाहिले जात आहे त्या या प्रकल्पाच्या विस्तारीकरणाचे काम हे कालमर्यादेत पूर्ण होण्यासाठी जमिनीचे पूर्ण हस्तांतरण व इतर बाबीची पूर्तता तत्परतेने होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शिवणगाव येथील प्रकल्पग्रस्तांना पर्यायी गावठाणात त्वरीत स्थलांतरीत करण्याबाबत व संपादीत जागेवरील अतिक्रमीत बांधकामे हटविण्याबाबत त्यांनी सक्त निर्देश दिले. त्यांनी यावेळी विमानतळ विस्तारीकरणात येणाऱ्या व भारतीय वायुदलास हस्तांतरीत केलेल्या जागेची भारतीय वायुदल, मिहान इंडिया लि.चे व म.वि.वि.कं.चे अधिकारी यांच्या समवेत संयुक्त पाहणी केली.