अमरावती :- शेती हाच डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांचा जीव की प्राण होता आणि त्यांनी आपले सर्व आयुष्य शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी खर्ची घातले, असे प्रतिपादन प्रसिध्द व्याख्याते व पुणे येथील कृषीतज्ज्ञ डॉ. सुधीर भोंगाळे यांनी केले. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील डॉ. आंबेडकर अभ्यास केंद्राच्यावतीने डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून ‘डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख व भारतीय कृषी क्षेत्र’ या विषयावर सोमवारी 10 एप्रिल, 2023 रोजी डॉ. के.जी. देशमुख सभागृह येथे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते, त्याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. तुषार देशमुख, प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्राचार्य डॉ. विजय नागरे, डॉ. हरिदास धुर्वे, अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. संतोष बनसोड उपस्थित होते.
डॉ. सुधीर भोंगाळे पुढे बोलतांना म्हणाले, डॉ. भाऊसाहेब यांनी वेगवेगळ्या देशात जावून तेथील शेतीचा अभ्यास केला व भारतातही शेती उत्पादनवाढीसाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न केले. कृषी विद्यापीठ अमरावतीत व्हावे, अशी डॉ. भाऊसाहेबांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न देखील केले. जपानमधील भातशेतीचाही त्यांनी अभ्यास केला होता. तर नार्वे देशातील मासे उत्पादनाचा त्यांनी अभ्यास करुन भारतात मासे उत्पादन कसे वाढविता येईल, जेणेकरुन शेतकरी आणखी कसे सुखी होतील यासाठी त्यांनी प्रयत्न केले. 1956 मध्ये त्यांनी भारत कृषक समाजाची स्थापना केली. दिल्ली येथे 1960 मध्ये 82 दिवसांचे जागतिक कृषी प्रदर्शनही भरविले व वेगवेगळ्या देशांचे राष्ट्राध्यक्ष या परिषदेला उपस्थित होते. क्रांतीसूर्य महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर त्यांची नितांत श्रध्दा होती व त्यांच्या विचारसरणीवर ते चालत राहिले.
याप्रसंगी व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. हरिदास धुर्वे, प्राचार्य डॉ. विजय नागरे यांनीही मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणात कुलसचिव डॉ. तुषार देशमुख म्हणाले, महापुरुषांचा आदर्श घेऊन त्यांचे विचारकार्याचे आपण आपल्या जीवनात आचरण करावे, जे जे शक्य आहे ते निश्चितच केले पाहिजे, जेणेकरुन आपला आदर्श आपली मुले, विद्यार्थी घेतील. प्रास्ताविक डॉ. संतोष बनसोड, संचालन अभिजित इंगळे यांनी, तर आभार भाग्यश्री गाडगीळ हिने मानले. कार्यक्रमाला विद्यापीठातील सर्व शैक्षणिक व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.