शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ – माळशिरस, धाराशिव, लातूर येथील सभांतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

लातूर :- दुष्काळग्रस्त माढ्यात पाणी पोहोचवितो अशी शपथ घेऊन पंधऱा वर्षांपूर्वी महाराष्ट्रातील एका बड्या नेत्याने शेतकऱ्यांची फसवणूक केली, पाण्यासाठी वणवण करायला लावले, त्याचा हिशेब करून त्याची शिक्षा त्या नेत्याला देण्याची वेळ आली आहे, असे आवाहन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी शरद पवार यांच्यावर माळशिरस, धाराशिव, लातूर येथे झालेल्या सभांतून जोरदार हल्ला चढविला.

तीव्र उन्हाळ्याने महाराष्ट्र तापलेला असतानाही, आज मंगळवारी एकाच दिवसात पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस, धाराशिव आणि लातूर येथील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह नाईक निंबाळकर, अर्चना पाटील, सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारासाठी घेतलेल्या झंझावाती प्रचार सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाल्याने, महाराष्ट्रातील महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या निर्विवाद विजयावर शिक्कामोर्तब झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

मंगळवारी सकाळपासून महायुतीच्या प्रचारार्थ झालेल्या सभांकरिता भर उन्हात उपस्थित असलेल्या जनतेसमोर पंतप्रधान मोदी यांनी पुन्हा एकदा देशसेवेसाठी स्वतःस समर्पित करण्याचा संकल्प सोडला. जनतेच्या सेवेसाठी नव्हे, तर देशाला लुबाडून सत्तेची मलई चाखण्यासाठी आळीपाळीने पंतप्रधानपदावर बसण्याच्या व देशाचे विभाजन करण्याच्या काँग्रेस-इंडी आघाडीच्या प्रयोगास साथ देऊ नका असे आवाहनही मोदी यांनी केले. गेल्या साठ वर्षांत काँग्रेसने देशासाठी काही केले नाही, ते आमच्या सरकारने दहा वर्षांत केले, असा दावाही पंतप्रधानांनी केला. तब्बल साठ वर्षे गरीबी हटावचा केवळ नारा देत मतांसाठी गरीबांना झुलविणाऱ्या काँग्रेसने गरीबांसाठी काहीच केले नाही, मोदी सरकारने मात्र दहा वर्षांत 25 कोटी लोकसंख्येस गरीबीतून बाहेर काढले असून आज देशातील 80 कोटी लोकसंख्येस मोफत धान्य मिळत आहे, ही जनतेच्या प्रेमाची पुण्याई आहे, असेही त्यांनी नम्रपणे नमूद केले. माझ्या जीवनाचा प्रत्येक क्षण देशाच्या आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित राहील अशी ग्वाहीदेखील याप्रसंगी त्यांनी दिली.

माढा मतदारसंघातील दुष्काळी भागाला पंधऱा वर्षांपूर्वी पाणी देण्याचे आश्वासन देणारा बडा नेता कृषिमंत्री होता. पण उसाला दर वाढवून देणे त्याला जमले नाही, एफआरपी वाढवून देण्यासाठीही या नेत्याने काहीच केले नाही, या बड्या नेत्याने सहकारी साखर कारखान्यांच्या आयकराचा प्रश्न सोडविला नाही, इथेनॉल निर्मितीला चालना देण्यासाठीही काहीच केले नाही. ही सारी कामे आम्ही करून दाखविली असून काँग्रेसच्या सत्ताकाळात वर्षानुवर्षे रखडलेले अनेक प्रकल्प आमच्या सरकारने पूर्ण केले, असेही मोदी म्हणाले.

सहकार क्षेत्राच्या समस्या सोडविण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना, वीजबिलांचे ओझे हलके करण्यासाठी सौरवीज वापराची योजना, तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनविण्याचा संकल्प, शेतकऱ्यांना सन्मान निधी, या अनेक योजनांची माहिती देतानाच, अयोध्येतील राम मंदिराची उभारणी, कलम 370 रद्द करून काश्मीरला भारताचा कायमस्वरूपी अविभाज्य भाग बनिवण्याचे धाडसी पाऊल, तिहेरी तलाक प्रथा रद्द करण्याचा निर्णय आदी अनेक निर्णयांची यादीच मोदी यांनी या सभांमधून जनतेसमोर सादर केली.

धाराशिव आणि लातूरमधील प्रचार सभेत बोलताना सशक्त भारताच्या भविष्याचा संपूर्ण आराखडाच जनतेसमोर सादर करून पंतप्रधानांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार प्रहार केले. कोविड काळात देशात लस तयार केल्यामुळे जगातील असंख्य लोकांचे प्राण वाचले असून विकासाला गती देणारा देश म्हणून भारताने आपली ओळख जगात अधोरेखित केली आहे, असे ते म्हणाले. याआधी काँग्रेसच्या सत्ताकाळात देशात दहशतवादी हल्ले होत असत, आणि काँग्रेसचे सरकार हतबलपणे जगासमोर मदतीची याचना करत असे. असे कमजोर पक्ष देशाला सशक्त सरकार कसे देणार, असा सवालही मोदी यांनी केला. विश्वासघात, फसवणूक ही काँग्रेसची ओळख बनली असून सत्ता मिळाल्यावर जनतेची संपत्ती लुबाडण्याचा त्यांचा इरादा आहे, या आरोपाचा मोदी यांनी पुनरुच्चार केला. साठ वर्षे सत्तेत असलेल्या काँग्रेसने शेतकऱ्याच्या शेतात पाणी पोहोचविले नाही, पण आम्ही दहा वर्षांत घराघरात नळ दिले, सिंचन योजनांना गती दिली आणि नव्या सिंचन योजना आखल्या, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेतून तीन लाख कोटी रुपये वितरित करण्यात आले असून धाराशिवच्या शेतकऱ्यांना 800 कोटी रुपये दिले गेले आहेत, असे ते म्हणाले.

आम्ही आत्मनिर्भर भारताचा संकल्प जाहीर करतो, ‘एक भारत’ म्हणतो, तेव्हा काँग्रेसच्या शाहजाद्यांना ताप भरतो, अशा शब्दांत त्यांनी राहुल गांधी यांचाही समाचार घेतला. आमचे सरकार सामान्य माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी रात्रंदिवस काम करत असताना इंडी आघाडीचे नेते मात्र मोदींना शिव्याशाप देत जनतेच्या मनात संभ्रम पसरविण्याचे काम करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून खोटा प्रचारही सुरू केला असून मोदी सत्तेवर आल्यास संविधान बदलणार अशा अफवा पसरवून जनतेस घाबरविले जात आहे, असे ते म्हणाले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात गृहभेट उपक्रम

Wed May 1 , 2024
मुंबई उपनगर :- लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे म्हणून मुंबई उपनगर जिल्ह्यात आता ‘स्वीप’ उपक्रमांतर्गत गृहभेट उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यास मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. मुंबई उपनगर जिल्हा जनगणनेनुसार देशातील सर्वात मोठा जिल्हा आहे. या जिल्ह्याची सध्याची लोकसंख्या 93.56 लाख असून जिल्ह्यात 87 गावांचा समावेश आहे. हीच बाब विचारात घेवून लोकशाही शासनव्यवस्था अबाधित राहण्यासाठी आपले एक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com