‘युथ एम्पॅावरमेंट समिट’च्या माध्यमातून विदर्भातील तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तीन दिवसीय रोजगार मेळाव्याचे उद्घाटन

नागपूर : तरुणाईला आपली उन्नती साधण्यासाठी शिक्षण, कौशल्य विकास आणि रोजगार आवश्यक आहे. विदर्भातील तरुणाईची रोजगाराची गरज ‘युथ एम्पॅावरमेंट समिट’च्या माध्यमातून पूर्ण होत असून तरुणाईला रोजगाराचे व्यासपीठ उपलब्ध झाले असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

विदर्भातील युवक आणि युवतींसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, फॉर्च्यून फाऊंडेशन, जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने १७, १८ व १९ फेब्रुवारी रोजी आमदार निवास, सिव्हिल लाईन्स येथे रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या रोजगार मेळाव्याचे उद्घाटन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते उद्घाटनपर भाषणात बोलत होते.

रोजगार मेळाव्याचे आयोजन करणा-या संपूर्ण युथ एम्पॅावरमेंट टीमचे अभिनंदन करीत उपमुख्यमंत्री म्हणाले की, आपला देश हा सर्वाधिक तरुणाई असलेला देश आहे. ३५ वर्षाखालील लोकसंख्येचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६५ टक्के आहे. देशाच्या विकासात तरुणाईचा सहभाग महत्त्वपूर्ण आहे. २०१४ पूर्वी दहाव्या स्थानावर असलेली आपली अर्थव्यवस्था आता पाचव्या क्रमांकावर आली आहे. लवकरच ती तिसऱ्या स्थानावर येईल. रोजगाराशिवाय अर्थव्यवस्था विस्तारित होऊ शकत नसल्याचे उपमुख्यमंत्री पुढे म्हणाले.

देशातील स्टार्टअप विषयी बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ पूर्वी बोटावर मोजण्याइतके असलेले स्टार्ट अपची संख्या आता सुमारे ८० हजारापर्यंत पोहोचली आहे. रोजगार निर्मितीचा दरही वाढला आहे. तरुणाईच्या कल्पनाशक्तीला वाव मिळत आहे. आताच्या एकूण स्टार्टअप पैकी ८० टक्के स्टार्ट अप हे ‘टीअर टू’ शहरांमधील आहेत. स्टार्ट अपच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होत आहे. राज्य सरकारच्या माध्यमातूनही मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीचा प्रयत्न होत आहे. २०१४ पूर्वी ईपीएफओ खात्यांची पाच कोटी असलेली संख्या आता २७ कोटींवर पोहोचली आहे. याचा अर्थ मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होत आहे. कुठल्याही रोजगार निर्मिती उपक्रमाला, मेळाव्याला राज्य सरकारचे संपूर्ण सहकार्य, पाठिंबा असेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

उदघाटन समारंभाप्रसंगी जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, आमदार मोहन मते, आ. टेकचंद सावरकर, माजी आमदार सुधाकरराव देशमुख, माजी आमदार प्रा. अनिल सोले, परिणय फुके, उद्योजक प्यारे खान, राजेश रोकडे, प्रशांत उगेमुगे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगेश बन तर आभार आशीष वांदिले यांनी मानले.

‘युथ एम्पॅावरमेंट समिट’विषयी…

‘युथ एम्पॅावरमेंट समिट’मध्ये विविध क्षेत्रांतील १५८ कंपन्या सहभागी झाल्या आहेत. या रोजगार मेळाव्यात पाच हजारांपेक्षा जास्त रिक्त जागांवर युवकांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे नेमणूक करण्यात येणार आहे. एका तरुणाला जास्तीत जास्त पाच कंपन्यांमध्ये मुलाखती देण्याची संधी या मेळाव्याच्या माध्यमातून मिळणार आहे. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारे स्टॉल्स असणार आहेत. तसेच राष्ट्रीयकृत बँकेचे स्टॉल्स पण असणार आहे. स्टार्टअप आणि मुद्रा लोन यासंदर्भात माहिती देणारे व मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक उपलब्ध राहणार आहे. स्वयंरोजगारासाठी आवश्यक असलेली सयंत्रे दाखविण्यात येणार आहे. तीन दिवस विविध क्षेत्रांतील मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com