-महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
नागपूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेले संविधान हा जगातील एक अमूल्य दस्तावेज असून त्यातून देशातील राजकीय, सामाजिक, आर्थिक समानतेचा विचार परिपूर्णतेने प्रतिबिंबित होतो. त्यामुळे संविधानाप्रती निष्ठा व आदर राखणे हे देशातील सर्व नागरिकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक हेमराज बागूल यांनी येथे केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. बागुल बोलत होते. प्रसिध्द विचारवंत व व्याख्याते डॉ. त्रिलोक हजारे, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड, सहायक आयुक्त बाबासाहेब देशमुख, जिल्हा समाज कल्याण अधिकारी किशोर भोयर, जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके आदी यावेळी उपस्थित होते.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण दिनी कृतज्ञ स्मरण करताना आपण त्यांच्या विचारांचा जागर तेवता ठेवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे स्पष्ट करुन श्री. बागुल म्हणाले की, विविध धर्म, जाती, पंथ, प्रांत आणि असंख्य प्रांतामध्ये विभागलेल्या भारतीय समाजाला एका समान आकांक्षेच्या सुत्रात गुंफण्याचे महान कार्य संविधानाने केले आहे. करोडो नागरिकांच्या भावनांना या संविधानाने न्याय दिला असून देशातील लोकशाहीचे संचलन करण्यासाठी ते पथदर्शक ठरले आहे. गेल्या 75 वर्षात तिचे झालेले संवर्धन हे या संविधानाचे मोठे यश आहे. लोकशाही ही केवळ राजकीय व्यवस्था नसून तिचे जीवनाच्या सर्व क्षेत्रात पालन झाले पाहिजे. बाबासाहेबांचे विचार हे विविध क्षेत्रात उपयुक्त असून त्याचा प्रचार प्रसार करणे हीच त्यांना स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात खरी आदरांजली ठरेल, असेही श्री. बागुल यावेळी म्हणाले.
डॉ. हजारे म्हणाले की, लोकशाही मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकारांचा उपयोग कसा करता येईल याकडे नागरिकांनी लक्ष केंद्रीत करावे. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना समान संधी, शिक्षण, आरक्षण, मुलभूत अधिकार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे. संविधानातील प्रत्येक कलमांची नागरिकांना माहिती करुन द्यावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातील आधुनिक भारत घडविण्यासाठी संविधानाने दिलेल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय अधिकार जाणून घेवून त्याचा लोकहितार्थ वापर करावा. त्यांनी यावेळी संविधानात नमूद असलेल्या कलमांचे उदाहरणासह मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. गायकवाड यांनी केले. ते म्हणाले की, देशातील ज्या-ज्या ठिकाणी डॉ. आंबेडकरांचे वास्तव्य राहिले आहे, अशा सर्व ठिकाणी बाबासाहेबांचे विचारांचा प्रचार-प्रसार होण्यासाठी, जनसामान्यांना प्रेरणा मिळण्यासाठी आजच्या दिवशी अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्ह्यातील दीक्षाभूमी व शांतीवन, चिंचोली येथेही अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनी केंद्र व राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाव्दारे देशातील इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना जातीचा दाखला वितरीत करण्याच्या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या माध्यमातून सर्वच क्षेत्रात देश अग्रेसर होण्यासाठी प्रत्येकाने आपले योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच मान्यवरांना बार्टीचे प्रकाशन असलेल्या ‘महाडचा मुक्तिसंग्राम’ या पुस्तकाची भेट देण्यात आली.