नवी दिल्ली :- प्राप्तिकर विभागाकडून काँग्रेसची चार बँक खाती काही महिन्यांपूर्वी गोठवण्यात आली आहेत. त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला एकही पैसा खर्च करण्यात येत नाही. आमच्याकडे आज दोन रुपयेही नाहीत, अशी खंत राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी बोलून दाखविली होती. त्यानंतर आज प्राप्तिकर विभागाकडून १,८२३ कोटींचा कर भरण्याची नोटीस देण्यात आली. यानंतर काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपावर निशाणा साधला. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी कडवी झुंज देऊ नये, यासाठी त्यांना पंगू करण्यात येत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला.
“भाजपाकडून कर दहशतवाद केला जात असून निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला आर्थिक पंगू करण्याचा प्रयत्न केला जात आहे”, असा आरोप याच पत्रकार परिषदेत काँग्रेसचे खासदार जयराम रमेश यांनी केला. तर भाजपा कर कायद्यांचे उल्लंघन करत असल्याचा आरोप खजिनदार अजय माकन यांनी केला. आम्हाला जो नियम लावला जातोय, तोच जर भाजपाला लावला तर त्यांना ४,६०० कोटींची नोटीस प्राप्तिकर विभागाने द्यायला हवी, असेही अजय माकन म्हणाले.