महाराष्ट्रात कायद्याचा धाक शिल्लक नाही – डॉ.हुलगेश चलवादी 

– गुन्हेगारीचा वाढता ग्राफ चिंताजनक

पुणे :- पुरोगामी महाराष्ट्रात बहुजनांसह इतर नागरिक वाढत्या गुन्हेगारीमुळे भयभीत आहेत.गुंडशाहीला मिळणारा राजकीय आशीर्वाद यासाठी मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरतोय. गेल्या काही काळात घडलेल्या घटनांवरून ते अधोरेखित होतंय,असा दावा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र मुख्य प्रभारी डॉ.हुलगेश चलवादी यांनी शनिवारी (ता.१८) व्यक्त केला. राज्यात महायुती सरकारचे बहुमतातील सरकार सत्तेत येताच समाजा समाजात तेढ वाढण्यासह गुंडगिरीतही कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पोलीस प्रशासनाचा वचक नसल्यामुळे परभरणीतील सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलीस कोठडीतील मृत्यू असो अथवा मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड, सर्वच प्रकरणात राज्य सरकार ‘बॅक फूट’वर आले असल्याचे डॉ.चलवादी म्हणाले.

गुन्हेगारीच्या वाढत्या आलेखामुळे तो प्रस्थापित राजकीय पक्षांकडून पुरस्कृत तर नाही ना? असा सवाल देखील डॉ.चलवादींनी यानिमित्ताने उपस्थित केला.संतोष देशमुख प्रकरणात राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणात अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोप करण्यात आले आहेत. गुन्हेगारांना मिळणाऱ्या राजाश्रयाचे हे जिवंत उदाहरण आहे.लॉरेन्स बिष्णोई सारखे गुंड कारागृहात बसून त्यांची टोळी चालवत आहेत.राज्यात सैफ अली खान,सलमान खान सारखे अभिनेते सुरक्षित नाहीत, तर सर्वसामान्यांची कल्पना करवत नाही.शिवाय कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिची हत्या करण्यात आल्याचा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारा आहे.

राज्यातील अनेक वस्त्या,भागांमध्ये गाव गुंड मोकाट आहेत. यंत्रणेच्या आशिर्वादाने सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे नागरिक हैराण असल्याचा दावा डॉ.चलवादी यांनी केला.गुन्हेगारीचा बिमोड करण्याचा एकसुत्री कार्यक्रम गृहखात्याने राबवण्याची आवश्यकता आहे.वाढते गुन्हेगारीचे प्रमाण, काही भागांतील जातीय तणाव आणि महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमुळे सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.मुंबई, पुणे आणि नागपूर यांसारख्या मोठ्या शहरांत सायबर गुन्ह्यांत वाढ झाली असून ग्रामीण भागात जमिनीच्या वादांमुळे गुन्हेगारीची वाढ होतानाही दिसत आहे. सरकारने यासंबंधी किमान आता तरी योग्य पावले उचलावीत, अशी मागणी डॉ.चलवादी यांनी केली आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

रोजगार निर्माण करणारे संशोधन काळाची गरज - केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी

Mon Jan 20 , 2025
– मोहता विज्ञान कॉलेजचा अमृत महोत्सव  नागपूर :- विदर्भात जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल, याचा विचार करण्याची गरज आहे. आपल्या प्रादेशिक गरजा लक्षात घेऊन रोजगार निर्माण करणाऱ्या संशोधनावर भर द्यावा लागणार आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. नितीन गडकरी यांनी केले. नागपूर शिक्षण मंडळ संचालित श्री मथुरादास मोहता विज्ञान कॉलेजच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!