नदी सफाई अभियानाचे कार्य प्रगतीपथावर

– नाग नदीच्या अंबाझरी जवळील पात्राची रुंदी वाढणार

नागपूर :- नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनात आणि अतिरिक्त आयुक्त श्रीमती आंचल गोयल यांच्या नेतृत्वात नागपूर शहरातून वाहणा-या नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी या तिन्ही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य प्रगतीपथावर आहे. १ फेब्रुवारी २०२४ पासून सुरु झालेल्या नदी आणि नाले स्वच्छता अभियानामध्ये आतापर्यंत शहरातील तिनही नद्यांची एकूण ३५ टक्के सफाई झालेली आहे. या सफाई अभियानामध्ये नदीच्या सखोल स्वच्छतेवर भर देउन जास्तीत जास्त गाळ काढला जात आहे. याशिवाय पावसाळ्यात पाण्याचा प्रवाह सुरळीत व्हावा व त्याला कुठलाही अडथळा निर्माण होउ नये यासाठी सिंचन विभागाच्या सुचनेनुसार अंबाझरी ते क्रेझी केसल व अंबाझरी घाट दरम्यान नाग नदीचे पात्र १७ मीटर रुंद करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू आहेत. पावसाळ्यापूर्वी प्रमुख तिनही नद्यांच्या स्वच्छतेचे कार्य पूर्ण होणे आवश्यक असून त्यादृष्टीने गती वाढविण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले आहेत.

नागपूर शहरातील नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदी यांच्या स्वच्छतेसाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नदी सफाई अभियान राबविण्यात येते. या अभियानाच्या माध्यमातून शहरातील तीनही नद्यांसह नाल्यांची सफाई करण्यात येते. यावर्षी मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने नदी स्वच्छता अभियानाला लवकर सुरूवात झाली. नाग नदीची लांबी १६.५८ किमी, पिवळी नदीची लांबी १७.४२ आणि पोहरा नदीची लांबी १५.१७ किमी आहे. नाग नदीची अंबाझरी तलाव ते पंचशील चौक, पंचशील चौक ते अशोक चौक , अशोक चौक ते सेंट झेव्हिअर स्कूल, सेंट झेव्हिअर स्कूल ते पारडी उड्डाण पूल आणि पारडी उड्डाण पूल ते पूनापूर (भरतवाडा – नाग व पिवळी नदी संगम) अशा टप्प्यांमध्ये स्वच्छता केली जात आहे. पिवळी नदीची गोरेवाडा तलाव ते नारा घाट, नारा घाट ते वांजरा एसटीपी आणि वांजरा एसटीपी ते नदी संगम पर्यंत अशा तीन टप्प्यांमध्ये स्वच्छता सुरू आहे. पोहरा नदीचे सहकार नगर ते बेलतरोडी पूल दरम्यानच्या स्वच्छतेचे कार्य सुरू आहे.‍ नदी स्वछता संदर्भात सोमवारी (ता. 29) मुख्य अभियंता श्री राजीव गायकवाड यांनी आढावा बैठक घेतली. नदी स्वच्छतेच्या कामाला गती देण्यासाठी व उर्वरित नदीच्या लांबीची सफाई करण्यासाठी अतिरिक्त 8 पोकलेन 1 मे पासुन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. 15 जुन 2024 पुर्वी शहरातील तीनही नदींची सफाई पुर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले. ‍

नागपूर शहरातील नद्यांची सखोल स्वच्छता व्हावी यादृष्टीने मनपाद्वारे नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात करण्यात आली. नदी स्वच्छतेसाठी ६ चमू तयार करण्यात आलेल्या असून, प्रत्येक चमूमध्ये मशीनचा समावेश आहे. मनपाचे तसेच भाडेतत्वारील पोकलेन, टिप्पर याद्वारे नदींची सफाई केली जात आहे. अतिरिक्त पाऊस आल्यासही पूर परिस्थिती उद्भवू नये याकरिता नद्यांची अधिकाधिक पाणी वाहून नेण्याची क्षमता वाढावी यासाठी नद्यांमधील गाळ मोठ्या प्रमाणात काढण्यात येत आहे. या सर्व कार्यावर देखरेखीसाठी संबंधित झोनमधील कार्यकारी अभियंत्यांकडे जबाबदारी निश्चित केलेली आहे. सध्या नाग नदीच्या स्वच्छतेसाठी एकूण ४ पोकलेन, एक जेसीबी, ३ टिप्पर तर पिवळी नदी करिता ३ पोकलेन, २ जेसीबी, २ टिप्पर आणि पोहरा नदीसाठी २ पोकलेन कार्यरत आहेत.

६९१३५ क्यूबिक मीटर गाळ काढला

नाग नदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या आतापर्यंतच्या एकूण १७.४७ किमी अंतराच्या सफाई कार्यातून एकूण ६९१३५.५७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे. यापैकी ३००२९.१० क्यूबीक मीटर गाळाची नदीपात्रातून इतरत्र वाहतूक करीत सुरक्षित ठिकाणी टाकण्यात आलेले आहे. नाग नदीच्या सफाई दरम्यान ३९९००.५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आले तर यापैकी २०३०६.१ क्यूबीक मीटर गाळ इतरत्र हलविण्यात आले. पिवळी नदीच्या सफाई दरम्यान २४०८५ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आला. यापैकी ९७२३ क्यूबीक मीटर गाळ नदी पात्रातून दुस-या ठिकाणी नेण्यात आले. पोहरा नदीची स्वच्छते दरम्यान यातून ५१५०.०७ क्यूबीक मीटर गाळ काढण्यात आलेला आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

महाराष्ट्र दिनाचा निषेध करून नव्या येणाऱ्या सरकारला देणार चेतावणी - विराआस

Tue Apr 30 , 2024
– विदर्भ राज्य आंदोलन समिती च्यावतीने पूर्ण ११ जिल्ह्यात महाराष्ट्र दिनाचा १ मे रोजी निषेध करून तिव्र आंदोलन करणार नागपूर :- विदर्भ राज्य आंदोलन समिती च्या वतीने सार्वत्रीक विदर्भातील निवडणुकीची रण धूमाळी संपल्या संपल्यास नव्या येणाऱ्या सरकारला चेतावनी देण्याच्या दृष्टीने व विदर्भाचे स्वत्रंत राज्य तात्काळ निर्माण करण्याच्या हेतुने विदर्भ निर्मितीचा आंदोलनाची सातत्या ठेवण्याच्या दृष्टीने १ मे हा निषेध दिन (काळा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com