फ्रान्स म्हटलं की सर्वप्रथम आपल्या डोक्यात काय येतं ? पॅरीस शहर ? आयफल टॉवर ? फॅशन ?…… फ्रान्स हा देश या सर्व गोष्टींसाठी जरी प्रसिद्ध असला तरी आणखी एका विशिष्ठ पेयामध्ये अग्रगण्य मानला जातो. आणि ते पेय म्हणजे द्राक्षाची वाईन. फ्रान्समधे ११ वेगवेगळे प्रदेश वेगवेगळ्या वाईनसाठी प्रसिद्ध आहेत, त्यातील एक म्हणजे जर्मनीच्या सीमेवरील ‘अॅल्सास’ या प्रदेशातील स्त्रासबर्गमध्ये प्रवास करतांना मला एक विलक्षण गोष्ट आधळली. प्रवास करताना आपण नेहमीच नाविन्याच्या शोधात असतो. आधी कोणत्याही नविन शहरात जातांना मी तेथील म्युझीयमला आवर्जुन भेट देत. नंतर लक्षात आलं म्युझीयमपेक्षाही चित्तवेधक काही स्थानिक वास्तु असतात. स्त्रासबर्गमध्ये ह्या जागा शोधतांना मला इंटरनेटवर ऐतिहासीक गुफाघर असे काहितरी सापडलं. शहरामधे गुफा हे ऐकून मला ही आश्चर्य वाटले नंतर कळलं इथे वाईन सुद्धा संग्रहित केल्या जाते.
गुगलवरून पत्ता शोधुन त्या जागेवर पोहचले तर तिथे मोठे जिल्हा रुग्णालय आढळले. आपल्याकडुन चुक झाली की काय असा विचार डोक्यात येतच होता की, समोरच्या एका पर्यटकाने तोच पत्ता एका स्थायिकाला विचारला. रुग्णालयाच्या एका बाजुला तळघराचा रस्ता सापडला. आत प्रवेश विना मुल्य, पण तळघरात आहे तरी काय ? तर मोठे वाईन चे कोठार!
हे कोठार १३९५ साली बांधण्यात आले, तेव्हा येथील लोकांनी जिल्हा रुग्णालय शहराच्या हद्दीबाहेर स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेतला होता. आता हे शहराच्या मध्यभागी आहे. पण या रुग्णालयाच्या तळघरात वाईन का, हे ऐकून मी अचंभीत झाले. तर आधीच्या काळी स्वतःच्या उपचाराकरीता लोकांकडे बरेचदा पुरेसे सोन्याची नाणी नसत. म्हणून, मोबदला काय दयायचा तर स्वतःची पीके अथवा जमीन देत असत. या प्रदेशाचे मुख्य पीक म्हणजे द्राक्ष. कालांतराने रुग्णालयाने या प्राप्त झालेल्या जमिनिवर स्वत: द्राक्ष पीकवून वाईन तयार करणे सुरु केले. ही वाईन ते रुग्णांच्या उपचारांकरीता किंवा धार्मिक कृत्यांकरीता वापरत. तेव्हाच्या काळी वाईन कोठार हॉस्पीटलचा भाग असणे ही सामान्य गोष्ट होती.
१७१६ साली हॉस्पीटल जळून खाक झाले, पण तळघर विटाने बांधले असल्यामुळे शाबुत राहिले. रुग्णालय पुन्हा बांधण्यात आले व प्रत्येक रुग्ण दोन लिटर वाईन दर दिवशी देणे ही उपचार पद्धती १९ व्या शतकापर्यंत कायम होती व नंतर ती हळु हळु लुप्त झाली.
या कोठारात, सर्वात जुने असे १४७२ चे अलसेशीयन वाइन चे लाकडी बॅरल सुद्धा आहे. यात किमान ३००० लिटर वाईन होती. ती जगात फक्त तिनदा आतापर्यंत पिण्यात आली. कालंतराने ती लाकडी बॅरलमधे मुरुन ४५० लिटर इतकीच उरली आहे. ती आता अतिशय आम्लीय असल्यामुळे पिण्यालायक नाही आहे. तिचे जुने व नविन बॅरल येथे पाहण्यास मिळतात.
या कोठाराचे नुतनिकरण १९९४ साली करण्यात आले. १ लाख ५० हजार अल्सेशियन वाईन बाटल्या इथे दर वर्षी प्रक्रिया करून बाहेर विकल्या जातात. यातिल येणारा नफा रुग्णालयाची नविनतम साधने घेण्यात खर्च केल्या जातो.
महत्वाचे म्हणजे पर्यटक अजुनहि येथील जुनी वाईन प्रेस, भूयारी रस्ते व त्यात साठवलेले वाईन बॅरलस् आजहि विना मूल्य बघु शकतात.
एक वाईन कोठार कसे एका रुग्णालयाच्या उन्नतीस व येथील वाईन संस्कृतीस साकारण्यास कारणीभूत ठरले हे कौतुकास्पद आहे.
आपल्याही भारतात वाईन नव्हे पण असे कित्येक खाद्यपदार्थ व पेय आहे, व त्यांचा इतिहास आहे, तो अशाप्रकारे पर्यटकांपुढे सादर व्हावा असे मला वाटते.
-मनाली बोंडे, अमरावती