सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नांना म्हाडाचे बळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कोकण मंडळ, म्हाडाच्या घरांच्या संगणकीय सोडतीचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

मुंबई :- “सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांना बळ आणि आकार देण्याची जबाबदारी म्हाडा चांगल्या रितीने पेलत आहे. अनेक कुटुंबांचे गृहस्वप्न पूर्ण होण्याचा आजचा दिवस आहे. त्यांच्या स्वप्नपूर्तीच्या आनंदात सहभागी होण्याची संधी मला मिळाली याचा आनंद आहे,” अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.

म्हाडाच्या कोकण मंडळाची ४ हजार ६४० सदनिकांची आणि १४ भूखंडांची संगणकीय लॉटरी काढण्यात आली. या सोडतीचा शुभारंभ आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार किरण सरनाईक, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर सिंग, म्हाडाचे उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर, कोकण म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मारोती पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, घर म्हणजे म्हाडा हे नाते सामान्यांच्या मनात घट्ट झाले आहे. म्हाडाची गरजूंना घरे देण्याची कार्यप्रणाली कौतुकास्पद आहे. सोडतीला मिळालेला प्रतिसाद पाहिला तर म्हाडावरील विश्वास सिद्ध होतो. आजच्या सोडतीत घर मिळालेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने लवकरात लवकर घरांचा ताबा द्यावा. जेणेकरून त्यांचा गृहप्रवेश लवकर होऊ शकेल. आपण लवकरच पंतप्रधान आवास योजनेत अत्यल्प उत्पन्न गटासाठी खोणी, शिरढोण, विरार बोळींज, गोठेघर येथे सदनिका देणार आहोत. त्यासाठी केंद्राची मंजुरी मिळाली आहे. केंद्राचे दीड लाख आणि राज्य शासनाचे एक लाख रुपयांचे अनुदान त्यासाठी मिळणार आहे. या माध्यमांतून अनेकांचे घराचे स्वप्न साकार होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, नागरिकांची कामे त्वरित व्हावीत आणि त्यांना खेटे मारावे लागू नयेत, यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यांत मुख्यमंत्री सचिवालये सुरु केली आहेत. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम सुरू केला आहे. मंत्रालयात त्रास होऊ नये म्हणून अद्ययावत ‘सेन्ट्रल रजिस्ट्री’ सुरू केली आहे. या माध्यमातून समाजाभिमुख, लोकाभिमुख कारभार आम्ही करत आहोत.

यावेळी केंद्रीय राज्यमंत्री पाटील म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘प्रत्येकाला घर’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे, याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. येत्या काळात प्रधानमंत्री आवास योजना आणि म्हाडाच्या माध्यमातून राज्यातील सर्व बेघरांना घर मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र शासनाकडून होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमात रिमोटद्वारे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोडतीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डिग्गीकर यांनी केले तर आमदार कथोरे यांनी मनोगत व्यक्त केले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार मेट्रो रेल्वे खऱ्या अर्थाने मुंबईची जीवनरेषा - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Wed May 10 , 2023
चर्चगेट ते विधानभवन मेट्रो-३ भुयारी मार्गाची मुख्यमंत्र्यांनी केली पाहणी मुंबई :-  मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून मुंबईकरांची ती गरज पूर्ण होणार आहे. सध्या मेट्रो-३ हा मार्ग जवळपास ९० टक्के पूर्ण झाला असून येत्या डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत मेट्रो रेल्वेचा हा टप्पा पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंगळवारी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com