पीएमआरडीए क्षेत्राच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

– गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

– वारजे येथे उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन

पुणे :- पुणे महानगरपालिकेतर्फे नेदरलँड आणि जर्मनीच्या सहकार्याने वारजे येथील प्रभाग क्र. ३० मध्ये उभारण्यात येणाऱ्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसह अन्य विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व उपस्थितीत करण्यात आले.

वारजे येथील कै.अरविंद बारटक्के दवाखाना येथे आयोजित या कार्यमक्रमाला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर, आमदार सुनिल कांबळे (दूरदृष्यप्रणालीद्वारे), पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशात प्रथमच जर्मनी आणि नेदरलँडच्या आर्थिक सहकार्याने वारजे येथे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल होत आहे. नेदरलँडच्या विमा कंपनीने जोखिमीची हमी घेतली असल्याने सर्वदृष्टीने फायदेशीर असा हा प्रकल्प आहे. रुग्णालयाच्या खर्चावरील व्याजाचा दर केवळ सव्वा टक्के असल्याने रुग्णालयातील दरही कमी असतील. रुग्णालयात नेदरलँडने मान्य केलेल्या जागतिक दर्जाच्या सुविधा असतील. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास पुण्यासह महाराष्ट्रात खाजगी भागिदारीतून अशा आरोग्य सुविधा उभारता येतील, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

वारजे येथे उत्तम दर्जाचे पोलीस स्टेशन उभारण्यात येईल, त्यासाठी जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी. नव्याने उभारण्यात येणाऱ्या उड्डाणपूलामुळे वाहतूक कोंडी दूर होईल. पुणे, पिंपरी चिंचवड शहर, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्र हे राज्याच्या विकासाचे ग्रोथ इंजिन असल्याने या भागाच्या विकासासाठी राज्य शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोविड संकटाच्या काळात वैद्यकीय सुविधांचे महत्व लक्षात आले. त्यामुळे गेली दोन वर्षे वैद्यकीय सुविधा वाढविण्यावर भर देण्यात आला. गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याबाबत शासन संवेदनशील असून त्यासाठी योग्य निर्णय घेण्यात येत आहेत. सामान्य माणसाला चांगली वैद्यकीय सेवा मिळावी म्हणून मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलची कल्पना पुढे आली. या रुग्णालयातील १० टक्के खाटा मोफत आणि ६ टक्के खाटा शासकीय दराने देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्तम सुविधा असलेले रुग्णालय नागरिकांसाठी उभे राहणार आहे. बाणेर येथे देखील ५५० खाटांचे रुग्णालयही उभारण्यात येत आहे.

महापालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या ५०० कोटी रुपयांच्या कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत आहे. शास्तीकराच्या वसुलीला स्थगिती दिली असून त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. लोकसभा निवडणूकीनंतर त्यासाठी आवश्यक शासन निर्णय काढण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार सुळे म्हणाल्या, नव्याने उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयात आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांना चांगली वैद्यकीय सेवा मिळेल असा विश्वास व्यक्त करून रुग्णालयात सेवाभावी वृत्तीने वैद्यकीय सेवा दिली जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

आमदार तापकीर म्हणाले, येथे ३७५ खाटांच्या या रुग्णालयात नागरिकांना चांगल्या वैद्यकीय सुविधा मिळणार आहेत. खडकवासला येथे ऑक्सिजन पार्क उभारण्यात येणार आहे. खडकवासला परिसराच्या नियोजनबद्ध विकासासाठी शासनाचे सहकार्य होत असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात आयुक्त विक्रम कुमार यांनी महानगरपालिकेच्या विकासकामांबाबत माहिती दिली. घोरपडी येथील उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जर्मनीच्या स्टीफन यांचा संदेश दाखविण्यात आला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने घोरपडी येथे पुणे-सोलापूर रेल्वे लाईनवर उभारण्यात आलेला उड्डाणपूल आणि वारजे येथील समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीचे लोकार्पण करण्यात आले. तसेच घोरपडी येथील पुणे-मिरज रेल्वे लाईनवर नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल आणि वारजे येथील २४ मीटर डिपी रस्त्याचे भूमिपूजनही यावेळी करण्यात आले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य - अजित पवार

Mon Mar 11 , 2024
पुणे :- पुण्याच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासन प्राधान्य देत आहे. मेट्रो, रेल्वे, विमानसेवा आणि रस्ते विकासाच्या माध्यमातून शहरातील वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असून पुणे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. वडगाव शेरी परिसरातील विविध विकासकामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार सुनिल टिंगरे, पुणे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights