लोकहिताला शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘साम मराठी’ वृत्त वाहिनीतर्फे आयोजित सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा- मंथन विकासाचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे म्हणाले, “राज्याचा सर्वांगीण विकास हेच शासनाचे ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साथीने राज्याचा विकासरथ पुढे नेत आहोत. अल्प कालावधीत जनतेच्या हिताचे निर्णय या शासनाने घेतले आहेत. राज्याच्या हिताच्या दृष्टीने मोठे प्रकल्प बाहेर जाणार नाही, याची काळजी घेत आहोत. तसेच प्रधानमंत्री यांनी राज्यात मोठे प्रकल्प देण्यासाठी आश्वस्त केले असून राज्याच्या विकासाला वेग देण्यात केंद्र शासनाचा पाठींबा मिळत आहे.

शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ ‍शिंदे म्हणाले की, पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देण्याचा आमचा प्रयत्न आहे. राज्यात सेंद्रीय, नैसर्गिक शेतीला प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रयत्नात केंद्र शासनाचा चांगला पाठींबा मिळत आहे. शेतकरी आपला अन्नदाता आहे, त्याला सुखी करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. यावर्षी पावसाळ्यात अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकरी बांधवांना आपण भरीव मदत दिलेली आहे. याचप्रकारे परवडणारी घरे, चांगली आरोग्य सेवा मिळवून देण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.

५ ट्रिलियनची अर्थव्यवस्था उभारण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. महाराष्ट्र हा देशाचं ग्रोथ इंजिन असल्यानं यात राज्याची अर्थव्यवस्था १ ट्रिलियनपर्यंत नेऊन आपल्याला योगदान द्यायचे आहे. यासाठी मजबूत पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे. यात मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर, समृद्धी महामार्ग, एमटीएचएल, मेट्रो प्रकल्प असे महत्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत. हे प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी वॉररुमच्या माध्यमातून त्यांचा पाठपुरावा करण्यात येत आहे. ‘राज्याचा सर्वांगीण विकास’ या ध्येयातून शासनाचे काम सुरु आहे. या प्रयत्नात लोकांची साथ लाभत आहे. त्यांचा विश्वास जिंकून राज्याला आम्ही पुढे नेणार असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, साम वृत्तवाहिनीला १५ वर्षे पूर्ण झाली आहेत, तर सकाळ माध्यम समूह पत्रकारितेची शतकी वाटचाल करीत आहे. पत्रकारितेसोबतच सामाजिक बांधिलकीतून अनेक अभिनव असे समाजोपयोगी उपक्रम समूहाच्या माध्यमातून राबविले आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सामान्य नागरिक समोर ठेवून सुशासन नियमावली तयार करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

Wed Nov 16 , 2022
मुंबई :- सामान्य नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निराकरण होण्याच्या दृष्टीने आणि शासकीय कामात सुसूत्रता आणि पारदर्शकता असणे आवश्यकता आहे. यासाठी सामान्य व्यक्तीला समोर ठेवून आदर्श अशी कार्यप्रणाली तसेच सुशासन नियमावली तयार करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सुशासन नियमावली तयार करण्याकरिता नियुक्त समिती समवेत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सुशासन नियमावलीचा […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com