संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ता प्र 1 ऑगस्ट :- महसुल अधिकारी हा प्रशासनाचा कणा असून शासन व जनतेमधील महत्वाचा दुवा आहे .महसूल विभागाची नाळ शेती व शेतकऱ्यांशी जोडली आहे .जमिनीच्या विविध प्रकरणाशी निगडित असलेला आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जिव्हाळ्याच्या प्रश्नांचा ज्याच्याशी संबंध येतो तो महसूल विभाग असल्यामुळे त्यांच्या समस्यांचे निराकरण कालमर्यादेत करून नागरिकांचे समाधान होईल असे संवाद घालावे असे मौलिक प्रतिपादन तहसीलदार अक्षय पोयाम यांनी कामठी तहसील कार्यालयात 1 ऑगस्ट महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी व्यक्त केले.
तर जसे 1 एप्रिल ते 31 मार्च हे आर्थिक वर्ष मानले जाते तसेच 1 ऑगस्ट ते 31 जुलै हे महसूल वर्ष मानले जाते यानुसार 1 ऑगस्ट हा महसूल वर्षाचा पहिला दिवस आहे .राज्य शासनाने 11 जुलै 2002 रोजी महसूल दिनाच्या आयोजना संदर्भात पहिले परिपत्रक काढले होते यानंतर दरवर्षी 1 ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो.1 ऑगस्ट महसूल दिन हा दिवस मागे वळून आपल्या कामाचे परिक्षण करण्याचा दिवस आहे .शासनाच्या मध्यवर्ती विभाग म्हणून महसूल विभाग कार्यरत आहे .जमीन, महसुल वसुली, कायदा व सुव्यवस्था राखणे, गौंणखनिज स्वामीत्वधन वसुली, अनधिकृत गौण खनिज उत्पन्नावर कारवाही, विविध खात्याची थकीत वसुली, पाणी वापर परवानगी, रस्ता देणे, अडविलेले रस्ते खुले करणे, पाण्याच्या पाईपलाईनसाठो परवानगी देणे, सर्व प्रकारच्या निवडणुका, जनगणना, आर्थिक गणना, कृषी गणना, आधारकार्ड, विविध सामाजिक योजना , रोजगार हमी योजना आदी महसूल खात्यामार्फतच राबविल्या जातात.लोकांना विकासात्मक प्रशासन द्यायची जवाबदारी महसूल विभागाची आहे त्यामुळे लोकांच्या महसूल प्रशासनाकडून मोठ्या अपेक्षा असतात म्हणून सर्वांनी लोकभिमुख काम करण्याकडे कल वाढवावे असे समयोचित मार्गदर्शन कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित असलेले पदोन्नती प्राप्त नायब तहसीलदार महेश कुलदिवार तसेच नायब तहसीलदार संजय अनव्हाणे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी नायब तहसीलदार राजीव बमनोटे,नायब तहसीलदार अमर हांडा, नायब तहसीलदार माधुरी वाघमारे, सेवानिवृत्त कोतवाल विष्णू गजभिये, निवडणूक विभागाचे अधिकारी चंद्रिकापुरे, वरिष्ठ लिपिक माधुरी उईके सहपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी 1 ऑगस्ट महसूल दिनाचे औचित्य साधून सन 2021-2022या महसुली वर्षात विशेष उत्कृष्ट शासकीय कार्य केलेल्या कामठी तहसील कार्यालयातील तलाठी, मंडळ अधिकारी, कोतवाल, महसूल आधीकारी कर्मचाऱ्यांचा तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या शुभ हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.तसेच तत्कालीन राज्य सरकारने 1992 मध्ये लागू केलेल्या लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत पती हयात असताना पत्नीला मालमत्तेचे सहिस्सेदार ठरवून पत्नीच्या नावाने सातबारा करणाऱ्या लाभार्थ्यांना तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते सातबारा वितरण करण्यात आले यासह उत्पन्नाचे प्रमाणपत्र तसेच शिधापत्रिका वितरण करण्यात आले.
आज 1 ऑगस्ट महसूल दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला असून या कार्यक्रमात पुरवठा अधिकारी संदीप शिंदे,प्रस्तुतकार अमोल पौड, वरिष्ठ लिपिक वसुंधरा मांनवटकर, मंडळ अधिकारी संजय कांबळे, ,नितीन उमरेडकर, राम उरकुडे, सुधीर चव्हाण आदी अधिकारी कर्मचारी वर्गसह ग्रामीण भागातील सरपंच, पोलीस पाटील, कोतवाल ,शेतकरी वर्ग, प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक नायब तहसीलदार राजीव बमनोटे, संचालन निवडणूक विभागाचे चंद्रिकापुरे तर आभार शेख निसार यांनी मानले.
याप्रसंगी महसूल दिनाचे औचित्य साधून कामठी तहसील कार्यालयात मंडळ अधिकारी म्हणून कार्यरत असताना नुकतेच नायब तहसीलदार पदी पदोन्नती प्राप्त झालेले महेश कुलदिवार यांची वडसा देसाईगंज तर संजय अनवाणे यांची गोंदियाला बदली झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करीत तहसीलदार अक्षय पोयाम यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत निरोप देण्यात आला तसेच सेवानिवृत्त झालेले कोतवाल विष्णू गजभिये यांचा सुद्धा शाल श्रीफळ देऊन सत्कार करीत भावपूर्ण निरोप देत निरोप समारंभ कार्यक्रम सुद्धा पार पडला.