– टाकी बांधा अन्यथा आमरण उपोषण – सरपंच पाहुणे
बेला :- जवळच्या पिपरा येथील पाण्याची टाकी जुनी,जीर्ण व धोकादायक झाली आहे. त्या टाकीवर माकडांचा उच्छाद असतो. टाकीला झाकण नसल्यामुळे टाकीत माकडांचे मलमूत्र पडते.ते दूषित,घाणपाणी गेल्या अनेक वर्षापासून पिपरावासी पीत आहे. हि टाकी पाडून एक लाख लिटर क्षमतेची पाण्याची नवीन टाकी बांधण्यात यावी. अशी मागणी गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायतीचे वतीने करण्यात येत आहे. पण त्याकडे खनिज कर्म विभागाचे अभियंते दुर्लक्ष करत आहे असा आरोप करून सरपंच प्रशांत पाहुणे यांनी पाण्याचे टाकीसाठी १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे.
४५ वर्ष पुरातन पाण्याची टाकी जीर्ण झाली असून ती वरून पॅकबंद नाही. टाकीवर चढण्याची शिडी ठिकठिकाणी तुटली आहे.चढताना ती हलते. त्यामुळे टाकीवर चढणे अत्यंत धोकादायक आहे. माकडांच्या उच्छादामुळे टाकीचे पाण्यात त्यांचे मलमूत्र पडते. गेल्या दहा वर्षापासून सदर टाकी धुण्यात आली नाही. दूषित पाण्याचा पुरवठा येथील नागरिकांना होतो. त्यामुळे पिपरावाशी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. ही जीर्ण टाकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळ आहे. ती पडल्यास शिक्षक,आसपासचे नागरिक व शालेय मुलांचे जीवाला धोका होऊ शकतो. तत्कालीन आमदार राजू पारवे यांनी जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधी २०२३-२४ अंतर्गत पिपरा येथे नवीन पाण्याची टाकी बांधण्यात यावी. असे पत्र २६ जुलै २०२३ ला जिल्हा खणीकर्म अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय नागपूर यांचेकडे पाठवले. नवनिर्वाचित आमदार संजय मेश्राम यांनी सुद्धा याविषयी शिफारस केली. परंतु खनिज कर्म विभाग विभागाचे संबंधित अभियंता दुर्लक्ष करत आहे.असा आरोप सरपंच पाहुणे यांनी जिल्हाधिकारी नागपूर यांना पाठविलेल्या निवेदनातून केला आहे. पाणीपुरवठा नवीन टाकीची मागणी पूर्ण न झाल्यास येत्या १४ जानेवारी पासून पिपरा येथील सरपंच ग्रामपंचायत जवळचे सांस्कृतिक भवनात आमरण उपोषणाला बसणार आहे.
प्रतिक्रिया – पिपरा येथील पुरातन व धोकादायक पाण्याची टाकी पाडून नवीन टाकी बांधणे गरजेचे आहे. माकडांचे वावरण्याने गावाला घाण पाण्याचा दूषित पाणीपुरवठा होत आहे.यासाठी मी अनेकदा खनिज कर्म विभागाचे अभियंत्यांना भेटलो.अर्ज विनंत्या केल्या. तरीपण नवीन टाकी अद्याप मंजूर झाली नाही. ग्रामवासींना स्वच्छ,शुद्ध व मुबलक पाणी पुरवठा करण्याची माझी नैतिक जबाबदारी आहे. त्यासाठी मी येत्या १४ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहे.
– प्रशांत वसंतराव पाहुणे
सरपंच ग्रामपंचायत पिपरा