मनपा आयुक्तांनी केले महालातील अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे निरीक्षण

– कार्य त्वरीत पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला निर्देश

नागपूर :- मा. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार महाल परिसरात करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाम तोडण्याच्या कामाचे गुरूवारी (ता.२५) मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी निरीक्षण केले. यावेळी आयुक्तांनी नागरिकांशी संवाद साधला. संबंधित कारवाई मा. उच्च न्यायलयाच्या निर्देशानुसार लवकरात लवकर पूर्ण करण्याचे त्यांनी कंत्राटदाराला निर्देश दिले. तसेच अतिरिक्त कामगार या कामासाठी लावण्याचे व स्थापत्य अभियंता यांना या कार्यवाहीचे दररोज नि‍रीक्षण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.

गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त गणेश राठोड, नगर रचना विभाग उपसंचालक प्रमोद गावंडे, अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त हरीश राऊत, विधी अधिकारी प्रकाश बरडे, कार्यकारी अभियंता मंगेश गेडाम आदी याप्रसंगी उपस्थित होते.

महाल परिसरातील कल्याणेश्वर मंदिराजवळील ‘गायत्री प्लाझा’ या इमारतीत बांधण्यात आलेले अवैध फ्लॅट्सवर मनपाच्या अतिक्रमण विरोधी पथकाद्वारे कारवाई करण्यात आली असून येथील अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे. याबरोबरच या इमारतीत मंजुरी न घेता बांधण्यात आलेल्या इतर बांधकामांवरही कारवाई करण्यात येत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई सुरू आहे.

महाल येथे अहीरराव वाडा या जागेत गायत्री प्लाझाचे बांधकाम करण्यासाठी १९९२ मध्ये नगररचना विभागाकडून नकाशासाठी मंजुरी घेण्यात आली होती. मात्र संबंधित विकासकाने परवानगीपेक्षा अधिक बांधकाम करून येथील सुमारे ३२ फ्लॅट वेगवेगळ्या लोकांना विकले. येथील अवैध बांधकामाचा मुद्दा घेऊन २०१७ मध्ये उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. २५ सप्टेंबर २०१९ मध्ये न्यायालयाने अवैध बांधकाम तोडण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर १५ एप्रिल २०२४ रोजी न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार कारवाई करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी प्रशासनाला दिले. त्यानुसार तात्काळ कारवाई करीत संबंधित इमारतीतील अवैध बांधकाम पाडण्यास सुरूवात झाली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपा शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा उत्साहात

Fri Apr 26 , 2024
– आयुक्तांच्या हस्ते समर कॅम्पचे उद्घाटन चंद्रपूर :- महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शालेय शिक्षण विभागाच्या वतीने राज्यभर २०२४-२५ या शैक्षणिक वर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या मुलांसाठी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. त्यानुसार चंद्रपूर महानगरपालिकेच्या पीएम श्री. सावित्रीबाई फुले सेमी इंग्रजी उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळा येथे इयत्ता १ ली साठी दाखलपात्र विद्यार्थ्यांचा ‘शाळा पूर्वतयारी मेळावा क्र.१ उत्साहात पार पडला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com