– १० जणांवर गुन्हे दाखल
– बेलतरोडीतील घटना
नागपूर :- मालमत्ता गहाण ठेवून कर्ज देणाऱ्या एका प्रतिष्ठानला १० जणांनी मालमत्तेचे बनावट कागदपत्रे देऊन ७४ लाख ५० हजाराचे कर्ज घेतले. कर्जाची परतफेड केली नसल्याने अखेर चौकशीत त्यांनी बनावट कागदपत्रे देऊन फसवणूक केल्याचे लक्षात आले. याप्रकरणी प्रतिष्ठानच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलिसांनी आरोपींवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविला आहे.
वाठोडा रहिवासी नितीन हिंगणकर (४६) यांची बेलतरोडी भागात बेसा रोडवर आवास फायनान्शियल लि. नावाने प्रतिष्ठान आहे. या प्रतिष्ठानमध्ये मालमत्ता गहाण ठेऊन गृहकर्ज दिल्या जाते. हिंगणकर प्रतिष्ठानमध्ये शाखा प्रबंधक म्हणून काम करतात. दरम्यान आरोपी नीलेश पौणिकर, नीतेश पौणिकर, दिनेश पवार, विक्की पाठराबे, सचिन सोमकुवर, संदीप निंबोडकर, मनोजकुमार सार्वे, हेमंत सपकाळ, राम नंदनवार आणि अश्विन गृह उद्योगचे संचालक अशा दहाही जणांनी हिंगणकर यांच्या प्रतिष्ठामधून गृह कर्जासाठी अर्ज केला. त्यासाठी त्यांनी आपल्या मालमत्तेचे कागदपत्र गहाण ठेवले. मात्र, एक वर्ष होऊनही आरोपींनी कर्जाचा कोणताही हप्ता भरला नाही. त्यामुळे हिंगणकर यांना संशय आला. त्यांनी अधिक चौकशी केली असता आरोपींची कोणतीही मालमत्ता नसताना दुसऱ्याची मालमत्ता स्वतःची असल्याचे सांगून बनावट कागदपत्रे दिले. त्यावर ७४ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज उचलले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच हिंगणकर यांनी बेलतरोडी पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी विविध कलमान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.