श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या आवाहनानंतर अनेकांनी घेतला नि:शुल्क तिकीटांसाठी पुढाकार
नागपूर : देशातील ज्वलंत वास्तव, जळजळीत इतिहास पुढे आणणा-या ‘द काश्मीर फाईल’ चित्रपटाच्या श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे स्क्रिनिंग करण्यात आलेल्या पहिल्याच शो ला शहरातील नागरिकांनी ‘हाऊसफुल्ल’ प्रतिसाद दर्शविला. सोमवार (ता.२१)पासून व्हेरॉयटी चौकातील इंटरनिटी मॉल येथील पीव्हीआर मध्ये श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टच्या माध्यमातून ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी यांच्याद्वारे नि:शुल्क वितरीत करण्यात आलेल्या २५००च्या वर तिकीटांसाठी विशेष शो ला सुरुवात झाली. सोमवारी सकाळच्या पहिल्या शो ला नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दर्शविला. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष माजी महापौर संदीप जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
समाजातील तळागाळातील व्यक्तींना हा इतिहास जाणून घेता यावा, हे वास्तव त्यांच्याही पुढे यावे यासाठी अशा व्यक्तींना नि:शुल्क तिकीट उपलब्ध करून देण्याचा महत्वपूर्ण पुढाकार माजी महापौर संदीप जोशी यांनी घेतला. शो च्या दरम्यान नागरिकांनी या पुढाकाराचे कौतुक करीत अनेक सेवाभावी नागरिकांनी यासाठी आपले सहकार्य दर्शविले. पाटीदार समाजाद्वारे पीव्हीआर मधील संपूर्ण एका शो च्या तिकीट खरेदी करून त्या नि:शुल्क वितरीत करीत संदीप जोशी यांनी सुरू केलेल्या ‘द काश्मीर फाईल’ चित्रपटाद्वारे पुढे आलेल्या वास्तवाच्या जनजागृतीला प्रतिसाद दिला आहे.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्ट द्वारे एकूण २५०० तिकीट नि:शुल्करित्या वितरीत करण्यात येत आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी करण्यात आली होती. ऑनलाईन नोंदणी करणा-यांशी संपर्क साधून त्यांच्या तिकीट त्यांचे ओळखपत्र तपासून सोपविण्यात आले. २५०० नि:शुल्क तिकीटांच्या या चळवळीमध्ये आता अनेकांनी सहकार्याचे हात दिल्याने ही चळवळ वेग पकडू पाहत आहे. पाटीदार समाजबाधवांनी माजी महापौर संदीप जोशी यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपणही सामाजिक दायित्वाच्या भावनेतून संपूर्ण एक शो या शहरातील तळागाळातील व्यक्ती, सफाई कामगार, आरोग्य कर्मचारी, कामगार यांच्यासाठी दाखविण्यासाठी सहकार्य करीत असल्याचे यावेळी समाजाच्या प्रतिनिधींनी सांगितले.
श्री सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे सोमवारी (ता.२१) सकाळी ९.५० व दुपारी १.३० असे दोन शो नि:शुल्क तिकिटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले. मंगळवार (ता.२२)च्या दोन्ही शो साठीचे तिकीट आधीच सर्वांनी प्राप्त केले असून यासाठी मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा नागरिकांमध्ये देशाच्या इतिहासाप्रति जागरूकता निर्माण करण्यात महत्वाचा ठरणार आहे.