संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- कामठी नगर परिषद हद्दीत येणाऱ्या रमानगर उडानपुलाचे बांधकाम मागील सात वर्षांपासून प्रगतीपथावर असून या पुलाचे काम अजूनही अर्धवट रखडलेले आहे तसेच या पुलावर घालण्यात आलेली राखेची धूर ही उडत असल्याने या पुलाच्या कडेला असलेल्या निमुळत्या एकल रस्त्यावरून सुरू असलेल्या वाहतूकदार,शालेय महाविद्यालयीन विदयार्थी वर्ग तसेच या पुलाच्या कडेला असलेल्या लोकवस्तीतील राहिवासी नागरिकांना या राखग्रस्त धुळीचा सामना करावा लागत असल्याने या जीवघेण्या धुळीमुळे रमानगर, कामगार नगर,यादवनगर,भीमनगर ,रामगढ, आनंद नगर तसेच या मार्गातून मार्गक्रमण नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून बिनधास्त पणे श्वसन विकाराचे निमंत्रण मिळत आहे.
कामठी शहरात एखाद्या व्हीआयपी मंत्री ची एन्ट्री होत असली की या महामार्गावरून साफ सफाई केली जाते अन्यथा दररोज रस्त्याची नामधारी साफसफाई होत असल्याने या शहरातील महामार्गासह इतर लोकवस्तीतील रस्ते हे धुळमय असतात या मार्गावरून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना नाईलाजास्तव धुळीचा सामना करावा लागतो .सदर रमानगर उडानपुलाचे बांधकाम प्रगती पथावर असल्याने रमानगर बाह्य वळण मार्ग, यादव नगर,जयभीम चौक, बुद्धनगर,आदी मार्गाने वाहतुकीची वर्दळ वाढली आहे .वाढीव रहदारी मुळे या मार्गावर मोठ्या प्रमाणात धूळ पसरली आहे.खराब झालेले रस्ते जीवघेण्या धुळीत अडकले आहेत तसेच चोवीस तास प्रचंड धुळीत अडकलेल्या या भागात राहणाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.रस्त्यांच्या साफ सफाई अभावी ह्या रस्त्यावर पडलेली धूळ हे नागरिकांना रोगराईचे निमंत्रण देत आहे या धुळीचे गंभीर परिणाम भोगावे लागत आहेत. मात्र येथील प्रशासन नागरिकांच्या जीवाची काळजी न घेता अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे.धूळ कधीच खाली बसत नाही .
ही धुळ थेट नागरिकांच्या पोटात जात आहे ज्यामुळे नागरिकांच्या गंभीर श्वसन विकारात वाढ होत आहे. या धुळीमुळे सीओपीडी,आय एल डी ,न्यूमोकोनिओसीस, सबेस्टोसिस,सिलिकोसिस असे अनेक प्रकारचे गंभीर श्वसन विकार दिवसागणिक वाढत आहेत.आपण श्वास घेतो तेव्हा धुळीसोबत अनेक घटक नाकावाटे आत जातात यात अनेक सेंद्रिय कण, वेगवेगळी रसायने,विषारी घटक असू शकतात .धुळीतील कणांचे आकारमानही महत्वाचे असते. पीपीएम 2.5 म्हणजे 2.5मायक्रोन किंवा त्याहून सूक्ष्म कण अधिक धोकादायक असतात याहून सूक्ष्म कणामुळे कॅन्सर चाही धोका असतो तेव्हा स्थानिक प्रशासन धूळ कमी करून वातावरण प्रदूषणमुक्त करणार का.असा थेट सवाल येथील धुळीने त्रस्त नागरिक करीत आहेत.