– राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम, मनपा, नागपूर
नागपूर : महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गुरूवारी (ता.२२) पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा आढावा घेतला. गुरूवारी राजभवन येथे राज्यपाल महोदयांच्या अध्यक्षतेखाली नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी यांच्यासोबत आढावा बैठक पार पडली.
बैठकीत राज्यस्तरीय अधिकारी, संजय खंडारे, प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, मुंबई, डॉ. विनीता जैन, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ, नागपूर, डॉ. सुनिता गोलाईत, सहसंचालक, आरोग्य सेवा (कुष्टरोग व क्षयरोग) पुणे, डॉ. रामजी आडकेकर, सहसंचालक, आरोग्य सेवा कुष्टरोग, पुणे, राम जोशी, अप्पर आयुक्त, महानगरपालिका, नागपूर, डॉ. अशोक रणदिवे, अति. संचालक, आरोग्य सेवा, क्षयरोग, पुणे, डॉ. शिल्पा जिचकार, शहर क्षयरोग अधिकारी, म.न.पा., नागपूर, डॉ. अनिरुध्द कडु, जागतिक सल्लागार, पुणे, डॉ. स्वर्णा रामटेके, जागतिक सल्लागार, नागपूर विभाग व नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्हा व शहर क्षयरोग अधिकारी उपस्थित होते.
सभेमध्ये सर्वांनी निक्षय मित्रांबाबत माहिती दिली. या सभेअंतर्गत नागपूर शहरातील निक्षय मित्रांनी 737 पेक्षा जास्त क्षयरुग्णांना पोषण किट वितरीत केल्या जात आहे व त्यातील चार निक्षय मित्रांचे उज्वल पगारीया, संचालक, पगारीया गृप, नागपूर, डॉ. सुभाष राऊत, अध्यक्ष स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थान, नागपूर, नानक धनवाईन अध्यक्ष, सहयोग फांउडेशन, नागपूर, संजय सपेलकर, सचिव, सहयोग फांउडेशन, नागपूर यांचा राज्यपाल महोदय यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
संसर्गजन्य आजारामुळे होणा-या मृत्युमध्ये क्षयरोगाचा समावेश प्रमुख दहा आजारांमध्ये आहे. त्यामुळे संपूर्ण जगामध्ये व भारतामध्ये क्षयरोग आजाराचे व क्षयरोगामुळे होणा-या मृत्युचे प्रमाण लक्षणिय आहे. क्षयरुग्णांना उपचार कालावधीमध्ये पुरेसा पोषक आहार मिळाल्यास रोग बरे होण्याचे प्रमाण वाढते व रोगामुळे होणारी अनुषंगिक गुंतागुंत टाळता येते. उपचाराखाली असलेल्या व सामाजिक सहाय्य मिळावे यासाठी संमती दिलेल्या क्षयरुग्णांच्या उपचार कालावधीमध्ये पोषक आहार व ईतर सहाय्य मिळावे यासाठी राष्ट्रपती महोदयांनी दि. 09/09/2022 रोजी पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाची सुरुवात केली. यामध्ये रुग्णांना पोषण आहार व्यावसायिक प्रशिक्षण इ. सहाय्य निक्षय मित्राच्या माध्यमातून देण्याचे प्रयोजन आहे. क्षयरुग्णांमध्ये पोषक आहार हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. केंद्र शासनाने प्रतिव्यक्ति प्रतिमहिना आवश्यक धान्य, कडधान्य, डाळी, तेल इ. साहित्य हे क्षयरुग्णांना दिले असल्यास उपचारादरम्यान या सर्व धान्यांमधून प्रोटीनची पुर्तता त्यांच्या शरीरात होते व ते औषधोपचाराला दाद देउन क्षयरुग्ण हा लवकर बरा होउ शकतो.
याकरिता आपल्या जिल्हा व मनपा कार्यक्षेत्रातील स्वयंसेवी संस्था, राजकीय पक्ष निवडून आलेले प्रतिनिधी व शासनाच्या अधिनस्त असणारे अधिकारी व कर्मचारी यांनी 1 किंवा 2 क्षयरुग्ण दत्तक देउन त्यांना पोषण आहाराची उपचार कालावधीत पूर्तता केली तर 100 क्षयरुग्णांना पोषण आहार मिळेल आपला जिल्हा/आपलं शहर क्षयमुक्त होण्याकरीता सर्वांनी पुढाकार घेवुन योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल महोदय यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्यामध्ये 3689 निक्षय मित्रांची नोंदणी झालेलीआहे. 3689 मधुन 2521 निक्षय मित्रांनी सहकार्य करण्याचे दर्शविले आहे. महाराष्ट्र राज्यात टीबीचे 1,05,235 क्षयरुग्णांना निक्षय मित्र सहयोग प्राप्त करण्याबाबत सहमती दर्शविली आहे आणि आतापर्यंत राज्यात वेगवेगळया जिल्हयांमध्ये 31,824 क्षयरुग्णांना पोषण किट वितरीत करण्यात येत आहे.