-हवामान चेतावणी
– नागपूर जिल्ह्यासाठी Orange Alert
– नागपूर जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा अंदाज
नागपूर :- भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्याकरिता दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी करिता Orange Alert दिलेला असून बऱ्याच ठिकाणी जोरदार ते खूप मुसळधार स्वरूपाच्या पावसासह वादळीवारा व वीज गर्जना होण्याची शक्यता वर्तवलेली आहे.
संततधार होत असलेल्या पावसामुळे पेंच तोटलाडोह व नवेगाव खैरी धरण पूर्ण १००% भरलेले असून तोटलाडोह धरणाचे १४ पैकी १० दरवाजे ०.४ मी तर नवेगाव खैरी धरणाचे सर्व १६ दरवाजे ०.३ मी ने उघण्यात आलेले असून त्या मधून ५०० पेक्षा जास्त क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग पेंच नदीमध्ये सुरू आहे.
तसेच जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पातील धरणे जवळपास पूर्ण क्षमतेने भरलेले असून त्या धरणातून देखील नदीमध्ये पाण्याच्या विसर्ग सुरू आहे. या अनुषंगाने नदी व धरणा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
नागरिकांनी विषेशत: शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. पेंच, कन्हाण, कोलार, नांद नदी तर नागपूर शहरातील नाग, पिवळी, व पोहरा नदी शेजारी वसलेल्या गावांना व नागरिकांना अधिक काळजी व दक्षता घेण्याची गरज.
वीज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक असून चुकून सुद्धा झाडा खाली उभे राहू नये.
नदी व नाल्याच्या पुलावरून जर पाणी वाहत असेल तर धाडस करून कुठल्याही प्रकारे पुल ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
नदी, तलाव व धरणे या ठिकाणी नागरिकांनी विशेष: युवकांनी पाण्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करू नये.
नदी, धरण काठी वास्तव्याला असलेल्या नागरिकांनी विशेष काळजी घेणे आवश्यक असून पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमात होत असल्यास वेळेत सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.
जिल्ह्यातील समस्त नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांनी शासनाच्या सर्व सूचनांचे पालन करावे व स्वसंरक्षणासाठी सतर्क राहावे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नागपूर.
जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर
संपर्क क्र: ०७१२-२५६२६६८