– बँक खाते आधार संलग्न करण्याचे आवाहन
गडचिरोली :- गडचिरोली सारख्या नक्षल व दुर्गम भागात सोई-सुविधा नसतांनाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत १ लाख ५६ हजार ३५७ ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आणि त्यापैकी १ लाख ५३ हजार ५०२ अर्ज राज्य स्तरावर पडताळणी करुन पाठविण्यात आलेले आहे. या अर्जाची राज्यस्तरावर निधी वितरणाकरिता पडताळणी केली असता सुमारे २० हजार महिलांचे खाते हे आधार क्रमांकाशी सलग्न नसल्याचे (E-KYC) नसल्याचे आढळून आले आहे. दिनांक १७ ऑगस्ट २०२४ ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते बालेवाडी, पुणे येथिल कार्यक्रमातुन पात्र महिलांना निधी वितरीत केला जाणार आहे. यात गडचिरोली जिल्हातील ज्या महिलांचे खाते आधार क्रमांकाशी संलग्न नसेल त्यांचे खात्यात रक्कम वितरीत करतांना अडचण येणार आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ज्या पात्र महिलांचे खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाही त्यांनी तातडीने स्वतःचे मुळ आधार कार्ड, बँक पासबुक, जन्मतारखेचा पुरावा व स्वतःच्या किवा जवळचे नातेवाईकाचा मोबाईल घेवून आपले खाते असलेल्या बँक शाखेत, सीएससी केंद्र, सेतु सुविधा केंद्र, बँक व्यावसायिक मित्र किंवा बँक सुविधा केंद्रात तातडीने जावून आपले बैंक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे किवा इ-केवायसी करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले असल्याचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी प्रकाश भांदककर यांनी कळविले आहे.