लोककल्याणासाठी असलेला निधी लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून सर्वसामान्यांपर्यंत पोहचवू  – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

– पारशिवनी येथे सुमारे 2 हजार कोटी रुपयांच्या कामाचे भूमिपूजन 

नागपूर :- लोककल्याणकारी राज्याच्या भूमिकेतून आम्ही समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला. याची सुरुवात आम्ही अन्नदात्या शेतकऱ्यांपासून केली. केंद्रसारकारचे सहा हजार व महाराष्ट्र शासनाचे सहा हजार असे आपण १२ हजार रुपये शेतकऱ्यांना सावरण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला. राज्यातील वृद्ध व्यक्तींना आधार देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना आपण साकारली. लाडक्या बहिणींची योजना आणली. आपल्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना आणली. बांधकाम कामगारांसाठी आधार देणारी खास कल्याणकारी योजना आपण सुरू केली. या सर्व योजनांचा लाभ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्याचा आपण निर्णय घेतला. लोकांच्या कल्याणाचा निधी त्यांच्या हक्काचा आहे. लोक कल्याणाच्या भावनेतून हा निधी त्यांच्या पर्यंत पोहचविणे व वंचितांना न्यायाच्या कक्षेत आणणे याला आम्ही प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

पारशिवणी येथे सुमारे २ हजार कोटी रुपये किंमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पारशिवणी मैदान येथे आयोजित समारंभात ते बोलत होते. आमदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल व मान्यवर उपस्थित होते. या विकासकामात सत्रापूर उपसा सिंचन योजना, रस्ते, बंधारे, खिंडसी पुरक कालवा, सालई – माहुली पूल, नेऊरवाडा- पाली, घाटरोहणा – वाघोडा पुल, मनसर माहुली रस्त्यांचे रुंदीकरण व सिमेंटीकरण, रामटेक बसस्थानक नूतनीकरण, रामटेक पंचायत समिती प्रशासकीय इमारत, देवलापार अपर तहसील कार्यालय नवीन इमारत आदि कामांचा समावेश आहे.

गेल्या अडीच वर्षात कधी नव्हे ते शासनाने सर्वसामान्यांच्या व्यथा समजून घेतल्या. गोरगरिबांचे दु:ख ओळखले. सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले त्यातून सावरण्यासाठी आपण त्यांच्या बांधावर जाऊन एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदत पोहचविली. त्यांच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभे राहिलो. कोणत्याही शासकीय योजनांसाठी दलालाची साखळी आपण ठेवली नाही. केंद्राचा, राज्य शासनाचा जो निधी आहे तो थेट लाभधारकांच्या खात्यात जमा होत आहे. या माध्यमातून राज्यातील जनतेने एक स्वच्छ पारदर्शी सरकारची प्रचिती घेतली असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून मिळालेले पैसे अतिशय कल्पकतेने आमच्या काही बहीणी वापरत आहेत. यातून त्यांनी आपल्या छोट्या व्यवसायाला आकार दिला आहे. हा पैसा बाजारात खेळते भांडवल म्हणून वापरला जाऊ लागला आहे. या योजनेसमवेत लखपती दिदी योजनेसाठी आम्ही कटिबध्द झालो आहोत. उमेद अंतर्गत महिला बचत गटांची संख्या आम्ही 60 लाखांवरुन 1 कोटीपर्यंत लवकरच घेऊन जात आहोत. उमेदच्या अंतर्गत असलेल्या महिलांनाही अधिक भक्कम करु, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. आमदार आशिष जयस्वाल यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संवाद साधला. विदर्भातील विविध विकास कामांसह सिंचनाच्या दृष्टीनेही आपण मैलाचा टपा गाठल्याचे त्यांनी सांगितले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळामार्फत नागपूर वैनगंगा विकास खोऱ्यांतील सत्रापूर विकास योजनेच्या माध्यमातून सुमारे 10 हजार एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे. यासाठी 123 कोटी रुपये राज्यशासनाने दिले आहेत. या योजनेतून जे पंपगृह आहेत त्याद्वारे रामटेक तालुक्यातील 24 गावांतील 6 हजार एकर क्षेत्राला सिंचन उपलब्ध होत आहे.

विदर्भातील सिंचन क्षेत्राला न्याय देण्याकरीता आपण सातत्याने प्रयत्न केले. हा प्रकल्प अनुशेष निर्मुलनाचा एक भाग असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वैनगंगा-नळगंगा हा प्रकल्प विदर्भातील सिंचनाचे चित्र बदलविणारा प्रकल्प आहे. सुमारे 87 हजार कोटी रुपये यासाठी लागणार आहेत. यातून 10 लाख एकर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळेल. आमदार आशिष जयस्वाल यांनी अत्यंत कल्पकतेने आपल्या मतदार संघात शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली या शब्दात त्यांनी गौरव केला.

यावेळी आमदार आशिष जयस्वाल यांनी आपल्या मनोगतात मतदार संघातील विकास कामांविषयी कटिबध्दता व्यक्त करुन शासनाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Nagpur Metro Ridership @ 1.44 lakh on Saturday

Mon Oct 14 , 2024
Maharashtra Metro Rail Corporation Limited (Nagpur Metro Rail Project) ● Highest Nagpur Metro Ridership This Calendar Year ● Multiple events, Extended timings Help Soar Ridership NAGPUR :- Riding on extended train timings, Maha Metro Nagpur clocked an impressive ridership of 1,44,059 yesterday (Saturday). The city witnessed multiple celebratory events on 12th October due to Dhamma Chakra Pravartan Din, Dussehra and […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!