नागपूर : रुंद-स्वच्छ व सुंदर रस्ते, रस्त्याच्या कडेला सुशोभिकरण, विमानतळ परिसराचे सौंदर्यीकरण, चौका-चौकांमध्ये सौंदर्यीकरण, मेट्रो मार्गावर जागविण्यात येणारा महाराष्ट्राचा इतिहास व सांस्कृतिक वैभवाचे चित्र आणि फुटाळा तलावाचा फाउंटन शो आदी कामांना गती आली आहे. या सर्व कामांमुळे नागपूर शहराच्या सौंदर्यात व विकासात भर पडून जी-२० परिषदेचे आयोजन ऐतिहासिक ठरणार असून प्रशासन सज्ज झाले आहे.विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय आयुक्त डॉ. विजयलक्ष्मी बिदरी यांनी येत्या मार्च महिन्यात नागपूर शहरात आयोजित करण्यात येणाऱ्या जी-२० परिषदेच्या आयोजनाच्या तयारीसाठी आढावा बैठक घेतली. जी-२० परिषदेसाठी नागपुरात येणाऱ्या परदेशी पाहुण्यांसमोर सुंदर, स्वच्छ व गौरवशाली नागपूर शहराचे दर्शन घडविण्यासाठी स्थानिक प्रशासन व राज्य शासनाच्या विविध विभागांनी आखलेल्या योजना व त्यांच्या प्रगतीबाबत डॉ. बिदरी यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त राधाकृष्ण बी., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा आणि नागपूर सुधार प्रन्यासचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते. जी-२० परिषदेच्या माध्यमातून नागपूर शहराचे सौंदर्यीकरण आणि विकास होण्याच्या दिशेने शासकीय व गैर शासकीय संस्थांनीही पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी डॉ. बिदरी यांनी केले.
मेट्रोच्या वर्धा रोडवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे दर्शन
जी-२० परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांना विमानतळाहून शहरात प्रवेश करणार आहेत. या प्रवासात पुढे मेट्रोच्या छत्रपती चौक स्टेशन मार्गीकेच्या पिलर दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसह त्यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा सुंदर देखावा साकारण्यात येणार आहे. उज्ज्वल नगर मेट्रो स्टेशनच्या पिलर दरम्यान विदर्भातील आदिवासी व त्यांची गौरवशाली पंरपरा दर्शविण्यात येणारे विविध देखावे आणि मुर्त्या बसविण्यात येणार आहे. जयप्रकाश नगर मेट्रोस्टेशन पिलरच्या दरम्यान पेंच राष्ट्रीय अभयारण्यातील प्राणी व जैवसंपदा साकारण्यात येणार आहे.
यासोबतच शहारातील चिन्हीत रस्त्यांच्या दुतर्फा पादचाऱ्यांसाठी रस्ता, बसण्याची सोय करण्यात येणार असून फुल-झाडेही लावण्यात येणार आहेत. विमानतळ परिसराचेही सौंदर्यीकरण व सुशोभिकरण करण्यात येणार आहे. या परिसरात जी-२० परिषदेत सहभागी प्रतिनिधींच्या देशाचे ध्वजही लावण्यात येणार आहे. फुटाळा तलाव येथे परिषेतील प्रतिनिधींसाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या समन्वयातून होणाऱ्या या कार्यक्रमात महाराष्ट्राची व विदर्भाची लोककला दर्शविण्यात येणार आहे. जगातील सर्वात उंच फाउंटन शो हा फुटाळा तलावाचे खास आकर्षण असणार असून यासाठीही संबंधित यंत्रणा उत्तम तयारी करीत आहे.