– शहरातील सर्व शोभायात्रा मार्गांवर २५० कर्मचा-यांचे स्वच्छता कार्य
नागपूर :- थाटात साजरा झालेल्या रामनवमी उत्सवाचा उत्साह नागपूर महानगरपालिकेच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’च्या साथीने द्विगुणीत झाला. नागपूर शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांची रात्रीच स्वच्छता करण्याचे महत्वाचे कार्य मनपाच्या स्वच्छता चमूद्वारे करण्यात आले आहे.
रामनवमी निमित्त नागपूर शहरात मध्य नागपुरातील पोद्दारेश्वर राम मंदिर, पश्चिम नागपुरातील रामनगर चौकातील राम मंदिर यासह विविध भागातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. शोभायात्रेला लाखो नागपूरकरांनी उपस्थिती दर्शविली. शहरातील विविध भागातून काढण्यात येणा-या शोभायात्रेच्या मार्गावर स्वच्छता रहावी, यादृष्टीने मनपा आयुक्त तथा प्रशासक श्री. राधाकृष्णन बी. यांनी निर्देशित केले. त्यानुसार मनपाच्या ‘स्मार्ट स्वच्छता टिम’ने स्वच्छता कार्य पार पाडले.
शहरातील विविध भागातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मार्गांवर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले तर अनेक ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवर्षाव करण्यात आला. या संपूर्ण मार्गांवर स्वच्छता राखली जाईल याकडे मनपाद्वारे विशेषत्वाने लक्ष देण्यात आले. त्याचेच परिणाम शोभायात्रेचे मार्ग रात्रीच स्वच्छ करून ते सकाळपर्यंत वाहतुकीसाठी सुरळीत करण्यात आले. या स्वच्छतेच्या कार्यात मनपाच्या ६० कर्मचा-यांनी सकाळपाळीत तर १९० कर्मचा-यांनी रात्रपाळीत सेवा दिली. एकूण २५० स्वच्छता कर्मचा-यांच्या या सेवाकार्यात सर्व मार्गांवर ३० टाटा एस वाहने व ४ कॉम्पॅक्टरची व्यवस्था मनपाद्वारे करण्यात आली होती. गुरूवारी रात्री उशीरापर्यंत करण्यात आलेल्या स्वच्छता कार्याचे फलीत म्हणजे, शुक्रवारी (ता.३१) शहरातील सर्व रस्ते स्वच्छ होउन वाहतुकीसाठी मोकळे झाले.