यवतमाळ :- येत्या काही दिवसात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे. त्याअनुषंगाने तयारीचा जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी आढावा घेतला. पुढील आठवड्यात केव्हाही निवडणूक लागण्याची शक्यता असल्याने संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेली कामे वेळेत पार पाडण्याचे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, सहाय्यक जिल्हाधिकारी लघिमा तिवारी, अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर यांच्यासह निवडणूक कामाची जबाबदारी सोपविण्यात आलेले सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते.
निवडणुकीच्या दरम्यान अधिकारी, कर्मचाऱ्यांना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात. त्याअनुषंगाने सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण वेळेत पुर्ण करण्यात यावे. निवडणूक साहित्याचा पुरवठा निवडणूक निर्णय अधिकारी व मतदार केंद्रस्तरावर सुरळीतपणे करण्यात यावा. निवडणूक कार्य पार पाडण्यासाठी वाहन व्यवस्था पुरेशा प्रमाणात करून ठेवण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या.
निवडणुकीची घोषणा झाल्याबरोबर आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरु होते. त्यासाठी आवश्यक टीम तयार करण्यासोबतच आचारसंहितेचा कुठेही भंग होणार नाही, याची दक्षता घेण्यात यावी. आयोगाच्यावतीने उमेदवारांना करावयाच्या खर्चाची मर्यादा निश्चित करून देण्यात आलेली आहे. उमेदवारांकडून होणाऱ्या प्रत्येक खर्चाची नोंद होणे आवश्यक आहे. खर्च नियंत्रण पथकाने त्यादृष्टीने तयारी करावे.
मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदार यंत्र, सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी टपाली मतपत्रिका, कायदा व सुव्यवस्था, मतदार हेल्पलाईन, संवाद नियोजन, मतदान केंद्रावर देण्यात येणाऱ्या सोई-सुविधा, दिव्यांग मतदारांची नोंदणी व सुविधा आदींचा देखील त्यांनी प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.