नागपूर :- कोव्हिड मृत्यू विश्लेषण समितीद्वारे (Death Audit Committee) मंगळवारी (ता.१८) नागपूर शहरातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आढावा घेण्यात आला.
मनपा वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांच्या कक्षात पार पडलेल्या बैठकीत समितीचे अध्यक्ष मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, समितीचे सचिव वैद्यकीय अधिकारी (साथरोग) डॉ. गोवर्धन नवखरे, सदस्य इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेयो) फिजीशियन डॉ. सलामे, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र खडसे, आरोग्य उपसंचालक कार्यालयाच्या प्रतिनिधी डॉ. शितल मोहारे उपस्थित होते.
बैठकीमध्ये समितीपुढे मृत पावलेल्या एकूण ७ रुग्णांची माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता नागपूर शहरातील मृतांची संख्या २ असून यातील एका रुग्णाचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले. नागपूर शहराबाहेरील रहिवाशी असलेल्या ५ रुग्णांचा मृत्यू झाला असून यापैकी ४ मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे.
मृत्यू विश्लेषण समितीद्वारे कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संदर्भात काही शिफारशी करण्यात आलेल्या आहेत. त्यानुसार, कोव्हिड-19 मुळे मृत झालेले रुग्ण सहव्याधी असणारे व जेष्ठ नागरिक होते. त्यामुळे सहव्याधी असणा-यांना कोविड संसर्ग झाल्यास या रुग्णांवर विनाविलंब योग्य उपचार सुरु करावे. त्याचप्रमाणे जेष्ठ नागरीक ज्यांना सहव्याधी आहे, अश्या रुग्णांनी वेळ न घालविता त्वरीत वैद्यकीय सल्ल्याने उपचार सुरु करावे. सर्व आरोग्य संस्थांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सहव्याधी असणारे व्यक्ती व जेष्ठ नागरिकांना फ्ल्यू सदृष्य लक्षणे आढळताच त्यांची कोव्हिड चाचणी करुन योग्य ते उपचार सुरु करावे व आरोग्य स्थितीवर लक्ष देऊन आवश्यकतेनुसार रुग्णालयात भर्ती करावे. ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर कोव्हिड रुग्ण उपचार, संदर्भ सेवा व रुग्ण भर्तीची सोय असावी यामुळे रुग्णास निवासी क्षेत्रालगत उपचाराची सोय उपलब्ध होईल. ILR व सारी रुग्णाबाबत क्षेत्रीय सर्वेक्षण सक्षम करावे. या उपाययोजनांमुळे कोव्हिडमुळे होणा-या मृत्यूदरात निश्चित घट होईल, आदी शिफारशी समितीद्वारे करण्यात आलेल्या आहे.
कोरोनापासून होणारा धोका टाळण्यासाठी ही काळजी घ्या
– हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा
– सॅनिटायजरने हात निर्जंतूक करा
– गर्दीमध्ये जाणे टाळा
– गर्दीत जाण्याची गरज पडल्यास मास्क लावूनच घराबाहेर पडा
– खोकताना व शिंकताना तोंडावर रूमाल ठेवा
– वारंवार स्पर्श होणाऱ्या वस्तू, जागांना निर्जंतूक करा
– पौष्टिक आहार घ्या
हे टाळा
– हस्तांदोलन अथवा आलिंगन
– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे
– मास्क न वापरता गर्दीत जाणे
– कोव्हिड सदृष्य लक्षणांकडे दुर्लक्ष करणे
– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे