– संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त केले वंदन
नागपूर :- भारतीय संविधानाने समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही जीवनमूल्य जनमाणसात रुजवून प्रत्येक भारतीयाचे जीवन प्रकाशमय केले आहे. सुमारे १३५ कोटी लोकसंख्येच्या देशाला प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे कार्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानामुळेच साध्य झाले आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम यांनी केले आहे.
भारतीय संविधानाच्या ७५ वर्षपूर्तीनिमित्त त्यांनी मंगळवारी (ता.२६) मुंबई येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाच्या उद्देशिकेला वंदन केले. यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही जीवनमूल्य संपूर्ण भारतीय जनमानसात रूजली आहेत. देशाला समतेच्या न्याय मार्गावर नेताना संधीची समानता निर्माण करण्यासाठी संविधान झिजले आहे. इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेल्या आणीबाणीचा काळ आठवला आणि संविधानाला पायदळी तुडविण्याचे दिवस आठवले तरी संविधानाने त्यावर मात केली आणि देशामध्ये समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधूत्व ही जीवनमूल्य पुन:श्च प्रतिष्ठापित केली आहेत. संविधानाने भारतवर्षातील प्रत्येक माणसाचे जीवन प्रकाशमय केले आहे. विरोधी, वैरी, प्रतिगामी अशा प्रत्येकालाच चांगले जीवनमान देण्याचा, अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्याचा, आवाज मजबूत करण्याचे, प्रगतीच्या मार्गावर नेण्याचे प्रयत्न संविधानाच्या माध्यमातून झाले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी केलेले परिश्रम यामुळे देशातील दलित, शोषित, बहुजन, वंचित, पीडित, शेतकरी, शेतमजूर अशा प्रत्येकाला सन्मान देणारी जीवनमूल्य रूजविली आहेत, असेही भाजपा प्रदेश उपाध्यक्ष व प्रवक्ते ॲड. धर्मपाल मेश्राम म्हणाले.