– ’उत्तरायण 2023’या भारतीय महसूल सेवेत सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून रुजू होणाऱ्या 101 प्रशिक्षणार्थी अधिका-यांचा प्रशिक्षणाचा दीक्षांत समारंभ संपन्न
नागपूर :- कायदे, नियम आणि तंत्रज्ञान यांचा संगम कर विभागाला नवीन ओळख देत. मानव संसाधन हे तंत्रज्ञाना पेक्षा अधिक उपयुक्त असून यंत्रापेक्षा मानवी बुद्धीच कायदेशीर आणि बेकायदेशीर बाबतीत योग्य निर्णय देऊ शकते. भारतीय महसुल सेवा – आयआरएस मधील अधिकारी यांनी त्यांच्या पुढे येणाऱ्या आव्हानांना संधी म्हणून बघावे असे प्रतिपादन केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचे माजी अध्यक्ष जे. बी. मोहोपात्रा यांनी आज केले. ‘उत्तरायण 2023’या प्रशिक्षणकार्यक्रमा अंतर्गत भारतीय महसूल सेवेत सहाय्यक आयकर आयुक्त म्हणून रुजू होणाऱ्या 101 प्रशिक्षणार्थी अधिका-यांचा दीक्षांत समारंभ आज नागपूरस्थित राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला. समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून आज मोहोपात्रा बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख महासंचालक वसुंधरा सिन्हा उपस्थित होत्या.
महसूल सेवेत संवादाची अत्यंत आवश्यकता असून ज्येष्ठ अधिकारी आणि नवोदित अधिकारी यांच्यात दरी निर्माण होता कामा नये. सुसंवाद हाच उत्तम सेवेसाठी आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. येणाऱ्या काळात आयकर करदात्यांची संख्या वाढणार असून राष्ट्रविकासात त्यांचे योगदान लागणार आहे, असे मोहोपात्रा यांनी यावेळी सांगितल.
7 आठवडे चालणाऱ्या उत्तरायण या प्रशिक्षणामध्ये 6 आठवडे हे क्लास रूम मार्गदर्शन आणि 1 आठवडा भारत दर्शन अंतर्गत केरळ, राजस्थान, ओडिशा या राज्याची भेट समाविष्ट असल्याची माहिती राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमीच्या प्रमुख महासंचालक वसुंधरा सिन्हा यांनी यावेळी दिली.
17 जुलैला सुरू झालेल्या प्रशिक्षणाला एकूण 101 अधिकाऱ्यांची उपस्थिती असून यामध्ये 13 महिलांचा समावेश आहे. प्रशिक्षणात सर्वात जास्त प्रशिक्षणार्थी हे महाराष्ट्राचे असून त्यानंतर बिहार, झारखंड, तेलंगाणा, आंध्रप्रदेश या राज्यांचा समावेश आहे.
प्रशिक्षणार्थी अधिकारी पी.सत्यप्रसाद यांना ‘शैक्षणिक उत्कृष्टता’ याकरिता सुवर्णपदक तसेच एस.गायत्री या महिला अधिकारी यांना ‘सर्वोत्तम कामगिरी’ यासाठी पुरस्कार प्रदान करण्यात आला. उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमुख अतिथी जे. बी. मोहोपात्रा यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आले. उत्तरायण -2023 प्रशिक्षणाचे समन्वयक आणि संयुक्त संचालक डॉ. सुरजित कुमार साहा यांनी आभार प्रदर्शन केले. या कार्यक्रमाला एनएडीटीमधील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.