मुंबईच्या वेशीवर आलेल्या मराठा बांधवांना भेटले मुख्यमंत्री

– मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मनोज जरांगे यांनी सोडले उपोषण

– सर्वसामान्य, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर हितासाठी

– मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी घेतलेली जाहीर शपथ पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई :- मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले.

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांची नवी मुंबईतील वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे उपोषण सोडवले आणि जरांगे यांना सकल मराठा समाजासमोर राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत दिली. जरांगे यांच्या कपाळाला गुलाल लावत मुख्यमंत्र्यांची त्यांचे अभिनंदन केले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय..जय शिवराय आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या वेशीपर्यत आलेल्या मराठा समाज बांधवांना भेटण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकाळी सव्वा नऊच्या सुमारास वाशी येथे आले. त्यानंतर ते पायी चालत छत्रपती शिवाजी महाराज चौकात गेले त्याठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जरांगे यांच्या समवेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जरांगे व्यासपीठावर आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य शासनाने काढलेल्या अधिसूचनेची प्रत जरांगे यांना देण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या हाताने मोसंबीचा रस घेऊन जरांगे यांनी आपण उपोषण सोडल्याचे जाहीर केले. मराठा समाज बांधवांची मागणी पूर्ण केल्याबद्दल जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा यावेळी सत्कार केला.

यावेळी सकल मराठा समाज बांधवांशी संवाद साधताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी आपल्या प्रेमापोटी ह्याठिकाणी आलो आहे. दिलेला शब्द पाळणे ही माझी कार्यपद्धती आहे. मी देखील सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा असल्याने गरीब मराठा समाजाच्या दु:खाची जाणीव असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा समाजासाठी लढणारे कै. अण्णासाहेब पाटील यांच्या कर्मभूमीत हा कार्यक्रम होत आहे त्यांनाही मी अभिवादन करतो असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, आमच्या सरकारने सर्वसामान्यांसाठी, शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नव्हे तर सर्व समाज घटकांच्या हितासाठी घेतले आहेत.

सकल मराठा समाजासाठी आंदोलन करणाऱ्या जरांगे पाटील यांच्या संघर्षाचा विजय असल्याचे मत व्यक्त करतानाच कोणतेही गालबोट लागू न देता अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने हे आंदोलन यशस्वी केल्याबद्दल मराठा समाजाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक आणि अभिनंदन केले. जरांगे पाटील यांनी केलेल्या मागण्या राज्य शासनाने मान्य केल्या असून कुणबी नोंदी शोधताना सगेसोयऱ्यांचा देखील त्यात समावेश केला आहे. यासोबतच शिंदे समितीला मुदतवाढ द्यायला मान्यता दिली. मराठा आंदोलनात जे बांधव मृत्युमुखी पडले त्यांना देखील नुकसान भरपाई देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

अन्य समाज घटकांवर अन्याय न करता मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.

मनोगत व्यक्त करण्यापूर्वी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना पेढा भरवून त्यांचे आभार मानले. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी सकारात्मक पद्धतीने निर्णय घेऊन काल अधिसूचना काढली त्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार संजय शिरसाट, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, नवी मुंबई महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यपालांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रीडा महाकुंभाचा शुभारंभ

Sat Jan 27 , 2024
– पंजाबच्या रुरल ऑलिम्पिक प्रमाणे राज्याचा पारंपरिक क्रीडा महोत्सव दरवर्षी व्हावा : राज्यपाल रमेश बैस – आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशी खेळांना प्रोत्साहन देण्याची राज्यपालांची विद्यापीठांना सूचना – पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यामध्ये करण्यात येईल : मुख्यमंत्री मुंबई :- पंजाब मध्ये होत असलेल्या ‘किला रायपूर खेल महोत्सव’ अर्थात रूरल ऑलिम्पिक प्रमाणे महाराष्ट्रातील कबड्डी, खोखो, दांडपट्टा आदी पारंपरिक क्रीडा प्रकारांचा समावेश असलेला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!