शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

रत्नागिरी :- शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे अशी अपेक्षा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केली.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मरणार्थ कोकण वासियांकरीता राज्य शासनाद्वारे 20 ऑक्टोबर 1976 रोजी सुरु करण्यात आलेल्या या जुन्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या इमारतीचे नुतनीकरण, सुशोभिकरण व आधुनिकीकरण करण्यात आले. या वास्तुचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादाजी भुसे, आमदार रविंद्र फाटक आदि उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रत्नागिरी ही ऐतिहासिक वारसा असलेली भूमी आहे. या भूमीने विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशी नररत्ने दिली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात या वीरांचे योगदान मोठया प्रमाणावर आहे. शासनाचे कोकणच्या विकासाकडे बारकाईने लक्ष असून कोकणच्या विकासाकरिता शासन कटिबध्द आहे.

सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या वास्तूमध्ये सुमारे 1 लाख 14 हजार इतकी ग्रंथसंपदा असून याचा 50 हून अधिक संशोधक अभ्यासक लाभ घेत आहेत. लोकमान्य टिळक स्मृतीशताब्दी निमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी या वास्तूसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून सुमारे 5 कोटी रुपये उपलब्ध करुन दिले. या ग्रंथालयामुळे शहरवासियांची वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल तसेच विपुल ग्रंथ संपदेमुळे याचा संदर्भ ग्रंथालय म्हणूनही उपयोग होईल.

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com