संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी :- हवामान विभागाने जारी केलेल्या अलर्ट नुसार आज 20 जुलै ला पहाटे पाच वाजेपासून सुरू झालेल्या संततधार मुसळधार पावसाने कामठी तालुक्याला चांगलाच दणका दिला. यात एका दिवसात जवळपास 70 मी मी पावसाची नोंद करण्यात आली.तर झालेल्या संततधार पावसामुळे कामठी तालुक्यातील खेडी गावातील 4 कुटूंबातील 23 मजूर पावसाच्या पुरात अडकल्याची माहिती कळताच तहसिलदार गणेश जगदाळे यांनी एसडीआर एफ च्या पथकासह बोटी च्या साहाय्याने 23 ही मजुरांना बाहेर काढण्यात यश गाठले ज्यामुळे सुदैवाने जीवितहानी टळली.
कामठी तालुक्यातील खेडी गावातील श्री जी ले आउट मध्ये चार मजूर कुटूब वास्तव्यास होते.आज पहाटे अचानक झालेल्या संततधार पावसामुळे संपूर्ण तालुका जलमय झाला होता तसेच खेडी गावालाही चांगलाच फटका बसत गावाला पावसाच्या पूराणे चांगलेच वेढले असता श्री जी ले आउट मध्ये रहिवासी चार कुटुंब पुरात अडकले असता दरम्यान कुठलीही जीवितहानी न व्हावी यासाठी खेडी ग्रा प चे उपसरपंच नामदेव ठाकरे यांनी पुढाकार घेत तहसिलदार गणेश जगदाळे यांना माहिती दिली यावर तहसिलदार गणेश जगदाळे, नायब तहसिलदार राजीव बमनोटे यांनी त्वरित घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता ही पुरसदृश्य परिस्थिती नियंत्रणात आणून जीवितहानी टाळण्यासाठी त्वरित एसडीआरएफ चे पथक बोलावून तासंनतास ठिय्या मांडून बोटीच्या साहाय्याने तब्बल चार तासानंतर पुरात अडकलेल्या या चारही कुटुंबांना बोटीच्या साहाय्याने बाहेर काढण्यात तहसील प्रशासनाला यश आले.
पुरातून बचाव केलेल्या या 23 नागरिकांत पाच ते सहा वर्षीय दोन बालकांचाही समावेश होता तसेच पाळीव कुत्रेचा ही समावेश होता. हे 23 नागरिकांचा बचाव झाला असता यांनी एकच मोकळा श्वास घेतला. व तहसील प्रशासनाचे आभार मानले.या बचाव कार्यात तहसिलदार गणेश जगदाळे,नायब तहसीलदार राजीव बमनोटे,तलाठी विनोद डोळस,पोलीस पाटील,उपसरपंच नामदेव ठाकरे,सचिन घोडमारे, धीरज ढवळे,मेघराज म्हस्के आदींनी मोलाची भूमिका साकारली.