प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक्झाम वॉरियर्स’ च्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन

विद्यार्थांनी भयमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

मुंबई : “प्रत्येक विद्यार्थ्याने आपला अभ्यास भयमुक्त वातावरणात केला पाहिजे, हाच संदेश प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वारियर्स’ या पुस्तकातून मिळतो”, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले.           नॅशनल बुक ट्रस्टतर्फे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ पुस्तकाच्या मराठी आवृत्तीचे प्रकाशन आज राजभवन येथे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण व क्रीडा विभागातर्फे आयोजित या कार्यक्रमास शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.            राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले की, आपल्या देशाला सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशी समृद्ध परंपरा लाभली आहे. अशा या आपल्या देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाच्या माधमातून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच आपला अमूल्य असा भारत देश समजून घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून आपला अभिमान बाळगला पाहिजे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांनादेखील योद्धा म्हटले आहे. त्यामुळे विद्यार्थी योद्ध्यांनी भयमुक्त होवून परीक्षा द्याव्यात. या पुस्तकाची प्रत प्रत्येक ग्रंथालयास द्यावी, असेही त्यांनी सांगितले.एक्झाम वॉरियर्स ठरेल दीपस्तंभ : दीपक केसरकर

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर म्हणाले की, उत्कृष्ट शिक्षण देणे महाराष्ट्राची परंपरा आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लिखित ‘एक्झाम वॉरियर्स’ हे पुस्तक दीपस्तंभ ठरेल. मुलांचे भविष्य घडवण्यासाठी हे पुस्तक अतिशय महत्त्वाचे आहे. मातृभाषेतून शिक्षण दिले जावे असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. मातृभाषेत सर्वोत्कृष्ट शिक्षण देता येते. आपल्या मातृभाषेतून शिक्षण मुलांना लवकर अवगत होते. ते त्यांना लवकर समजण्यास मदत होते. त्याचा लाभ त्यांना पुढील शिक्षणासाठी होतो. चालू शैक्षणिक वर्षापासून अभियांत्रिकी शाखेची पुस्तके मराठी भाषेत उपलब्ध होतील. विद्यार्थ्यांनी मनातील भीती दूर करून पुढे गेले पाहिजे. हे पुस्तक प्रत्येक शाळेत पोहोचविण्याचे नियोजन शासनातर्फे करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गायत्री चौबे (गार्डियम स्कूल), आरव सांघवी (कॅम्पियन स्कूल), मोहन इराणी (सेंट मेरी स्कूल) प्रज्ञा दळवी (बालमोहन विद्यामंदिर), खलिदा अन्सारी (अंजुमन इस्लाम) या पाच शाळांमधील विद्यार्थ्यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘एक्झाम वॉरियर्स’ या पुस्तकाची प्रत भेट देण्यात आली. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव देओल यांनी प्रास्ताविक केले. सहसचिव इम्तियाज काझी यांनी आभार मानले

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

खासदार क्रीडा महोत्सव, वुशू स्पर्धेत एस.एस. ॲकेडमीचा दबदबा

Thu Jan 19 , 2023
वुशू स्पर्धा महावीर नगर मैदान नागपूर :- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून नागपूर शहरात सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील वुशू स्पर्धेत पहिल्याच दिवशी १४ वर्षाखालील वयोगटात विविध वजनगटात एस.एस. ॲकेडमीचा दबदबा राहिला. बुधवारी (ता.१८) महावीर नगर मैदानात सुरू असलेल्या स्पर्धेत २३ किलो वजनगटात मुले आणि मुलींमध्ये एस.एस.अकादमीने प्रथम स्थान पटकाविले. तर ४५ किलो, ४२किलो, २० आणि ३९ किलो वजनगटात […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
Verified by MonsterInsights