संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
– प्रतिबंध तरीही सुगंधित तंबाकू व गुटख्याची सर्रास विक्री
कामठी :- राज्य शासनाने गुटखा व सुगंधित सुपारीवर बंदी घातली असली तरी कामठी तालुक्यात गुटख्याच्या विक्रीतून दररोज लाखो रुपयाची उलाढाल होत असल्याचे चित्र आहे .यावर प्रतिबंध घालण्याकडे संबंधित प्रशासनाचा कानाडोळा होत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे प्रशासनाला गुटखा बंदीचा विसर पडल्याचे चित्र समोर आले आहे.
कामठी तालुक्यात खुलेआम मादक पदार्थाची विक्री होत असून ठिकठिकाणच्या पानटपरिवर सहजतेने गुटखा,मावा, तंबाकू सहजपणे मिळत आहे.
कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात एक हजार च्या आत पान टपऱ्या व किराणा दुकान आहेत या टपऱ्यावर बंदी असलेला गुटखा सर्रास विकला जातो तसेच शहर व ग्रामीण भागातील प्रत्येक टप्या टप्प्यावर ही अहोरात्र गुटखा व तंबाकू जन्य पदार्थ मिळते.यातून गल्लीबोळातील छोट्या मोठ्या दुकानांनाही अपवाद नसुन तेथे गुटखा सहज उपलब्ध होत आहे.राज्यात बंदी असल्याने हा गुटखा परराज्यातुन छुप्या मार्गाने कामठी तालुक्यात आणला जात आहे.तर प्रतिबंधित असलेला हा गुटखा व सुगंधित तंबाकू ठिकठिकानी मिळत आहे.पांनटपरी व किराणा दुकांनापर्यंत या मालाचा होलसेल पुरवठा केला जात आहे.कामठी शहरात सिंधी लाईन, हमालपुरा, बस स्टँड चौक, गोल बाजार, पिली हवेली चौक आदी ठिकानातून सुगंधित तंबाकू आयात करणारे व विक्री करणाऱ्यांची मोठी साखळी काम करत आहे. मात्र या साखळीला तोडण्यास यंत्रणेला अपयश येत आहे की सोयिस्कर दुर्लक्ष करून तस्कराना अभय दिला जात आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे हा सुगंधित तंबाकू व गुटखा दुचाकीवरून द्वारपोच केला जातो यातून मोठे अर्थकारण निर्माण झाले आहे.संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन अवैध गुटखा विक्री तात्काळ बंद करावी अशी नागरिकांची मागणी असली तरी या मागणीकडे अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.
गुटख्याची विक्री करताना दिवसाढवळ्या पांनटपरी व किराणा दुकानापर्यंत दुचाकीवरून वाहतुक होते .अन्न व भेसळ विभागाचे दुर्लक्षच गुटखा माफियांच्या पथ्यावर पडत आहे. खुलेआम गुरखा विक्री होत असताना संबंधित विभाग मूग गिळून गप्प कसा ?असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे तर यामुळे कायद्याची अंमलबजावणी फक्त कागदावरच केली जात आहे काय?असा प्रश्न सुदधा येथील सुज्ञ नागरिकांकडून केला जात आहे.