– भारतीय ज्ञान परंपरेवर विद्यापीठात प्रशिक्षण कार्यक्रम
नागपूर :- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात असलेली भारतीय ज्ञान परंपरा शिक्षकांनी योग्य प्रकारे समजून घ्यावी असे आवाहन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी केले. भारतीय ज्ञान परंपरा विभाग नवी दिल्ली तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील युजीसी मानव संसाधन विकास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ३१ जुलै ते ५ ऑगस्ट २०२३ दरम्यान अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. सिव्हिल लाईन येथील चिटनविस सेंटर येथे पार पडलेल्या प्रशिक्षणाचा समारोप शनिवार दिनांक 5 ऑगस्ट 2023 रोजी करण्यात आला. या कार्यक्रमात अध्यक्षीय स्थानावरून कुलगुरू डॉ. चौधरी बोलत होते.
अभ्यासक्रमातील ज्ञान विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजावे म्हणून शिक्षकांना ही प्रणाली समजून घ्यावी लागेल असे सांगत डॉ. चौधरी यांनी नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भारतीय ज्ञान परंपरेवर आधारित असल्याची माहिती दिली. शिक्षण कळावे म्हणून विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांना सोप्या भाषेत ज्ञान पोहचवावे लागणार आहे. शिवाय मातृभाषेतून दिले जाणारे शिक्षण विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे समजून येते. त्यामुळे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात मातृभाषेतून शिक्षण देण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. विद्यार्थ्याला समजेल तेव्हाच ज्ञानाची प्राप्ती होईल. ज्ञान उपयोगी पडत नसेल तर त्याचा काय फायदा असे कुलगुरू म्हणाले. चीनमध्ये स्वभाषेत शिक्षण घेत विद्यार्थी ज्ञान मिळवित आहे. आत्मसात केलेल्या ज्ञानाच्या बळावर चीन महासत्ता बनल्याचे कुलगुरू म्हणाले. समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी होते. प्रमुख अतिथी म्हणून श्रीनाथ पिठाधीश्वर श्री देवनाथ मठ सुरजी अंजनी ग्राम येथील प. पू. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, यूजीसी सचिव प्रा. मनीष जोशी, अनुराग देशपांडे, डॉ. चंद्रशेखर देठे, डॉ. प्रीती धार्मिक यांची उपस्थिती होती.
ज्ञान देणारी आपली परंपरा – आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज
आपली भारतीय परंपरा ज्ञान देणारी असल्याचे प्रतिपादन श्रीनाथ पिठाधीश्वर श्री देवनाथ मठ सुरजी अंजनी ग्राम येथील प.पू. आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज यांनी केले. भारतीय ज्ञान प्रणाली समजून घेण्यासाठी आपण येथे एकत्र आलो आहोत. एखाद्या संस्कृतीची, देशाची बाब येते. तेव्हा ती किती प्राचीन आहे, याचा शोध घेतला जातो. जगातील कोणताही धर्म साडेचार हजार वर्षे जुना नाही. मात्र, आपले महाभारत ५ हजार २०० वर्षांपूर्वी घडलेले आहेत. त्यापूर्वी सूर्यवंशी हे साडेनऊ लाख वर्ष प्राचीन असे आहे. त्यामुळे आपण किती प्राचीन आहोत हे कोणाला प्रमाणित करण्याची गरज नसल्याचे जितेंद्रनाथ महाराज म्हणाले. पृथ्वी गोल आहे हे वेदांमध्ये सर्वप्रथम आपणच सांगितले. आकाशातील ग्रहांचे अंतर किती हे देखील आपल्याच पूर्वजांनी मोजले आहे. शिवाय भारतामध्ये ऋषी आणि कृषीची सभ्यता असल्याचे ते म्हणाले.
देशभरातील प्रतिनिधींची उपस्थिती
विद्यापीठ अनुदान आयोगाचा भारतीय ज्ञान परंपरेवरील अल्पकालीन प्रशिक्षण कार्यक्रम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ३१ जुलै 2023 ते पाच ऑगस्ट 2023 दरम्यान पार पडला. शताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने सर्वप्रथम प्रशिक्षण वर्ग राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात शताब्दी महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने यूजीसीकडून देण्यात आला. देशभरातून १५७ प्रशिक्षणार्थींनी उपस्थिती दर्शविली होती. प्रशिक्षण वर्गाला भारतीय ज्ञान परंपरेचे समन्वयक अनुराग देशपांडे, यूजीसीचे सचिव प्रा. मनीष जोशी, डॉ. विनायक रजत भट, आचार्य श्रेयस कुरेकर, प्रा. रितेंद्र शर्मा, वेंकट राघवन आर., प्रो. जयरमण, डॉ. पंकज सक्सेना, डॉ. पी. राममनोहर, डॉ. व्यंकटेश्वर पै, डॉ. अंकुर कक्कर, डॉ. राघव कृष्णा, डॉ. माला कापडिया, डॉ. सचिन वशिष्ठ, अमन गोपाल सुरेका यांनी विविध क्षेत्रांमध्ये देशभरातून आलेल्या प्रतिनिधींना संबोधित केले.