-दोन प्रवासी मृत, सहा जखमी, 12 प्रवाशांना रूग्णालयात
-दोन कोच रूळावरून घसरले
-इतवारीच्या कोचिंग यार्डात रेल्वेची रंगीत तालिम
नागपूर :-टाटा इतवारी पॅसेंजरचे दोन चाक अचानक रूळावरून घसरले. एका कोचमध्ये ज्वलनशील पदार्थ ठेवल्याने आग लागली. कोचमध्ये 20 प्रवासी अडकून होते. ही घटना इतवारी रेल्वे स्थानकाच्या कोचिंग यार्डात सकाळी 10.02 वाजेच्या सुमारास घडली. माहिती मिळताच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापक, विभागीय अधिकारी, मदत वाहन, पाण्याचे बंब घटनास्थळी पोहोचले.
एखादी मोठी दुर्घटना झाल्यास अधिकारी, कर्मचारी, आरपीएफ जवान किती वेळात पोहोचतात आणि कशा पध्दतीने मदत कार्य करतात, याची रंगीत तालिम घेण्यात आली. मॉक ड्रील प्रसंगी दोन कोच रूळावरून घसरले तसेच एका कोचमध्ये आग लागल्याचे दृष्य साकारण्यात आले. या कोचमध्ये 20 प्रवासी अडकले आणि त्यांना बाहेर काढण्यासाठी कर्मचार्यांनी कशा पध्दतीने युध्दपातळीवर मदत कार्य केले याचे दृष्य या मॉक ड्रीलमध्ये पाहण्यासारखे होते. विशेष म्हणजे या कोचमध्ये अवैध पध्दतीने ज्वलनशील पदार्थ ठेवल्यामुळे आग लागल्याचे समोर आले.
याघटनेची माहिती रेल्वे नियंत्रण कक्षामार्फत मिळाली. यानंतर रूग्णवाहिका, मदत वाहन, विभागीय व्यवस्थापक, विभागीय अधिकारी, एनडीआरएफचे पथक, पाण्याचे बंब केवळ 20 मिनीटात पोहोचले. आणि बचाव कार्यालया सुरूवात झाली. एनडीआरएफच्या पथकाने कोचच्या वरचा भाग कटरने कापला आणि त्या मार्गाने अडकलेल्या प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले. यावेळी आरपीएफच्या पथकानेही प्रवाशांना बाहेर काढण्यास मदत केली.
लष्करी सेवेतील कर्मचार्यांनी विविध यंत्राचा वापर करुन दुसर्या कोचमधील आगीवर नियंत्रण मिळविले. तासाभरात आगीवर नियंत्रण मिळविण्यात जवानांना यश मिळाले. या घटनेत 2 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 12 प्रवाशांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. 6 प्रवाशांंना तत्काळ प्रथमोपचार देण्यात आले. दुपारी 12.30 पर्यंत दुर्घटनाग्रस्त डबे रूळावर आणण्यात आल्याचे दृष्य हुबेहुब साकारण्यात आले. सर्वांची मदत आणि धावपळ पाहून रंगीत तालिम होती, असे वाटेलच नाही.
याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक नामित त्रिपाठी, अपर मंडळ रेल्वे व्यवस्थापक ए.के. सुर्यवंशी, जी. वी. जगताप यांच्यासह मुख्य आरोग्य अधीक्षक किशोर कुमार, वरिष्ठ मंडळ संरक्षा अधिकारी दिलीप सिंह यांच्यास रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
@ फाईल फोटो