खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्ता व प्रमाणीकरणावर लक्ष्य द्यावे – राज्यपाल रमेश बैस

– राज्यपालांच्या हस्ते खादी ग्रामोद्योग मंडळाचे ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान’ प्रदान

मुंबई :- खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना आज चांगली मागणी आहे. या क्षेत्रामध्ये रोजगार निर्मितीची मोठी क्षमता आहे. ग्रामविकासातून देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी खादी व ग्रामोद्योग उत्पादनांना प्रोत्साहन दिले पाहिजे, असे सांगताना खादी व ग्रामोद्योग उत्पादनांच्या गुणवत्तेवर तसेच प्रमाणिकरणावर विशेषत्वाने लक्ष दिले पाहिजे, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी आज येथे केली.

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते राज्यातील ११ ग्रामीण उद्योजकांना ‘ग्रामोद्योग भरारी सन्मान पुरस्कार’ राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ तसेच ‘मेघाश्रेय फाऊंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या प्रोत्साहनाने सातारा जिल्ह्यात ‘मधाचे गाव’ विकसित केल्याबद्दल मंडळाचे अभिनंदन करुन राज्यात मधुमक्षी पालनाला चालना देऊन अधिक मधाची गावे निर्माण करावीत, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली. चांगल्या फुलांची शेती केली, तर त्यातून चांगले मध मिळेल व चांगले मध मिळाले, तर त्याला चांगले मूल्य मिळेल, असे राज्यपालांनी सांगितले.

खादीवर आधारित स्टार्टअप सुरु करावे, मुंबई येथे खादीवर आधारित ‘फॅशन शो’ चे आयोजन करावे, खादी ग्रामोद्योग उत्पादनांसाठी ई – व्यासपीठ सुरु करावे, तसेच खादी ग्रामोद्योग उत्पादनांच्या विक्रीसाठी मॉल निर्माण करावा.

खादी व ग्रामोद्योग मंडळाने २०४७ मध्ये होणाऱ्या देशाच्या स्वातंत्र्याच्या शताब्दी वर्षासाठी महत्वाकांक्षी लक्ष्य निर्धारित करावे. तसेच उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी कृती योजना आखावी, अशी सूचना त्यांनी मंडळाला केली.

आपल्या वाटचालीत खादी व ग्रामोद्योग मंडळाचे मोठे योगदान आहे. आपण सलग तीन वर्षे खादी यात्रा काढली व खादीचा प्रचार प्रसार केला, अशी आठवण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी यावेळी सांगितली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मधाचे गाव असले पाहिजे. त्यातून रोजगार निर्माण होतील, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळाने पुढील वर्षीपासून आपले स्वतंत्र पुरस्कार सुरु करावेत, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

खादी हा देशाचा आत्मा आहे. खादी व ग्रामोद्योग उत्पादनांचा प्रसार करण्यासाठी ‘हर घर खादी’ या उपक्रमाची सुरुवात करीत असून प्रत्येकाने किमान एक तरी खादीची वस्तू घेतली, तर लोकांना रोजगार मिळेल, असे मंडळाचे सभापती रवींद्र साठे यांनी सांगितले.

खादी म्हणजे केवळ खादीचे वस्त्र नसून, ग्रामोद्योगातून तयार झालेल्या साबणापासून शाम्पू तेल व चपलेपर्यंत खादीची व्याप्ती आहे, असे खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांनी सांगितले. खादी व ग्रामोद्योग मंडळ सर्व लोकांपर्यंत पोहोचत आहे व त्यातून लोकांच्या जीवनात परिवर्तन होत आहे असे त्यांनी सांगितले.   

राज्यपालांच्या हस्ते यावेळी उद्योजक एकनाथ जाधव (यवतमाळ), अशोक साळवी (रत्नागिरी), अक्षय कोळप (सांगली), बाळोजी माळी (उस्मानाबाद), क्षमा धुरी (सावंतवाडी), अशोक गडे (जळगाव), हर्षदा वाहने (भंडारा), जितेंद्र परदेशी, मंगेश चिवटे, सिद्धेश चौधरी व जितेंद्र हरियान यांचा ‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी मंडळाच्या ‘ग्रामोद्योग’ मासिकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमाला उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मंडळाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन जगताप, ‘मेघाश्रेय फाउंडेशन’च्या अध्यक्षा सीमा सिंह प्रामुख्याने उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी 524 कोटींचा आराखडा तत्काळ सादर करावा - कृषीमंत्री धनंजय मुंडे

Wed Aug 30 , 2023
मुंबई :- राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असून या योजनेअंतर्गत मंजूर असलेल्या 524 कोटींच्या निधीच्या खर्चाचा आराखडा तत्काळ सादर करावा, असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. राज्याच्या अर्थसंकल्पात सोयाबीन व कापूस पिकांसाठी सन 2022-23 ते सन 2024-25 या तीन वर्षांच्या कालावधीत 1 हजार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com