– मदत पेटी जमा झाले एक लाख ६८ हजार रूपये
अमरावती :- संत गाडगेबाबांच्या कृतीशील विचारांचा आदर्श जामगावा खडका येथील तलाठी सुनील राऊत यांनी आपल्या कृतीतून घालून दिला आहे. आजूबाजूच्या भ्रष्ट व्यवस्थेत स्वत:ला जाणीवपूर्वक प्रामाणिकतेचा डाग लावून घेत गरजू, हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘तलाठी शिक्षण मदत पेटी’तून होत असलेली आर्थिक मदत हा ग्रामस्थांच्या मदतीने साकारलेला समाज व्यवस्थेतील चमत्कार असून, गावोगावी असे सुनील निर्माण व्हावे, असे प्रतिपादन गझलनवाज भीमराव पांचाळे यांनी केले.
मोर्शी तालुक्यातील जामगाव (खडका) येथे रविवारी तलाठी शिक्षण मदत पेटीतील रकमेच्या लोकार्पण कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे उद्घाटक शेतकरी नेते विजय विल्हेकर, गीता पांचाळे, प्रदीप म्हैसणे, ताजखान आदी उपस्थित होते. ‘तलाठ्याची नोकरी करताना आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून सुनील राऊत यांनी १२ वर्षांपूर्वी एकलारा या गावी ‘तलाठी शिक्षण मदत पेटी’ हा अभिनव उपक्रम सुरू केला. या उपक्रमात ग्रामस्थांच्या मदतीतून आज विविध ठिकाणी विद्यार्थी उच्चशिक्षण घेत आहे, ही मोठी उपलब्धी आहे. एक प्रशासकीय अधिकारी आपल्या संकल्पनेतून, ग्रामस्थांना सोबत घेत कशी किमया साधू शकतो आणि गरजवंतांची कशी मदत करू शकतो, याचे उत्तम उदाहरण यापेक्षा दुसरे असू शकत नाही’, असे गझलनवाज भीमराव पांचाळे यावेळी बोलताना म्हणाले. अशा सुनीलच्या पाठीशी समाजाने उभे राहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी शिक्षण मदत पेटीत पाच हजार रूपयांची मदतही भीमराव पांचाळे यांनी केली.
मातीवर राहणारी माणसंच मातीतील माणसांसाठी काम करणाऱ्या माणसांच्या पाठीशी उभी राहतात, हे जामगाव खडकावासियांनी तलाठी सुनील राऊत यांच्या पाठीशी उभे राहून दाखवून दिले. या मदत पेटीत जमा झालेल्या गावकऱ्यांच्या श्रममूल्यातून मूल्य जपणारी उद्याची पीढी निर्माण होईल, असा विश्वास कार्यक्रमाचे उद्घाटक विजय विल्हेकर यांनी यावेळी व्यक्त केला.
कार्यक्रमानंतर मदत पेटी सर्वांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. या पेटीत गेल्या चार महिन्यांत गावकऱ्यांनी तब्बल एक लाख ६८ हजार ७६९ रूपये रोख व डिजिटल बँकिंगद्वारे १६ हजार रूपयांपेक्षा अधिक रक्कम जमा केली. ही सर्व रक्कम विविध महाविद्यालयात शिकत असलेल्या, स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. कार्यक्रमास जामगावच्या सरपंच लीला कुमरे, उपसरपंच नीलेश ठाकरे, माजी सरपंच मनोज पेलागडे, पत्रकार नितीन पखाले, गझलकार प्रफुल्ल भुजाडे, पळसोनाचे सरपंच सुमित गुर्जर, खडकाचे सरपंच राहुल फुले, दीपक जवंजाळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तलाठी सुनील राऊत, अमर मेटे, अतूल घोंगडे, अमोल बनसोड यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप म्हैसणे यांनी केले. संचालन योगेश गावंडे यांनी केले, तर आभार सुनील राऊत यांनी मानले.