स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची बैठक संपन्न 

नागपूर :-  नागपूर महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहामध्ये बुधवारी (ता.२१) स्वाईन फ्लू मृत्यू विश्लेषण समितीची (Death Audit Comity) बैठक पार पडली. बैठकीत नागपूर शहरातील स्वाईन फ्लू बाधित आणि मृत्यूचे विश्लेषण करण्यात आले.

स्वाईन फ्लूची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रत्येक नागरिकाने सुरक्षात्मक काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.

मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत शासकीय रुग्णालयांमधील स्वाईन फ्लू तज्ज्ञ डॉ. गुंजन दलाल, डॉ. मिलींद सुर्यवंशी, डॉ. राजरत्न वाघमारे, मनपाचे साथरोग अधिकारी डॉ. गोवर्धन नवखरे व खासगी रुग्णालयांमधील स्वाईन फ्लू तज्ज्ञ उपस्थित होते.

बैठकीमध्ये नागपूर शहरातील शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये दाखल संशयीत स्वाईन फ्लू रुग्ण व त्यातील बाधित यासर्वांचा आढावा घेण्यात आला. समितीसमोर ३० स्वाईन फ्लू संशयीत रुग्णांच्या मृत्यू विषयी माहिती ठेवण्यात आली. त्याचे विश्लेषण केले असता यापैकी २२ रुग्ण स्वाईन बाधित होते तर इतर ८ जणांचा मृत्यू इतर कारणांमुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीतील ११ रुग्णांचा समावेश असून ११ पैकी ५ रुग्णांचा स्वाईन फ्लू ने तर उर्वरित ६ रुग्णांचा मृत्यू इतर कारणांमुळे झालेला आहे. नागपूर ग्रामिणमधील ३ मृत्यू स्वाईन फ्लू संशयीत असल्याचे निदर्शनास आले, विश्लेषणानंतर तिनही मृत्यूमुखी हे स्वाईन फ्लू बाधित असल्याचे स्पष्ट झाले. नागपूर व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यातील ११ मृत्यू नागपुरात झाले. त्यापैकी १० मृत्यू हे स्वाईन फ्लू मुळे तर १ मृत्यू अन्य कारणामुळे झाले. इतर राज्यातील दाखल रुग्णांपैकी ५ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. त्यापैकी ४ रुग्ण हे स्वाईन फ्लू बाधित होते तर एका रुग्णाचा इतर कारणामुळे मृत्यू झाला.

या वर्षी नागपूर शहरात आतापर्यंत एकूण ५८ मृत्यू हे स्वाईन फ्लू संशयीत असल्याचे दिसून आले. विश्लेषणानंतर यापैकी ४६ रुग्ण हे स्वाईन फ्लू बाधित असल्याचे स्पष्ट झाले. यापैकीत मनपा हद्दीतील १५, नागपूर ग्रामिणमधील ६, इतर जिल्ह्यातील १४ आणि इतर राज्यातील ११ रुग्णांच्या मृत्यूचा समावेश आहे.

नागपूर शहरात आतापर्यंत ५८७ स्वाईन फ्लू बाधितांची नोंद झालेली आहे. यामध्ये नागपूर शहरातील ३१४, नागपूर ग्रामिणमधील १०४, इतर जिल्ह्यातील १६९ अशा एकूण ५८७ रुग्णांचा समावेश आहे.

स्वाईन फ्लू टाळण्याकरीता ही काळजी घ्या

– हात सातत्याने साबण व पाण्याने धुवा

– गर्दीमध्ये जाणे टाळा

– स्वाईन फ्लू रुग्णापासून किमान ६ फूट दूर रहा

– खोकताना व शिंकताना तोंडाला रुमाल लावा

– भरपूर पाणी प्यावे, पुरेशी झोप घ्यावी

– पौष्टीक आहार घ्या

हे करु नका

– हस्तांदोलन अथवा आलिंगन

– सार्वजनिक ठिकाणी थुंकणे

– डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

स्वच्छ भारत अभियान : प्लास्टिक विरुध्द मनपाची कारवाई

Thu Sep 22 , 2022
नागपूर :-  स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवारी (ता. २१) ९ प्रतिष्ठानांवर कारवाई करून ६३ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात लक्ष्मीनगर, धरमपेठ, धंतोली, नेहरूनगर आणि सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात ४ प्रतिष्ठानांवर कारवाई करून २०,०००/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच ७ किलो प्लास्टिक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com