मुंबई :- सध्या जिल्हास्तरावर स्वाधार योजना राबविण्यात येत असून आगामी काळात ही योजना तालुकास्तरावर नेण्यात येईल, असे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
विधानसभा सदस्य लहू कानडे, बळवंत वानखेडे, दीपक चव्हाण अणि प्रा. वर्षा गायकवाड यांनी ‘अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत करण्यात येणारी तरतूद’ याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती.
मंत्री संजय राठोड म्हणाले की, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणाकरिता विविध योजना राबविल्या जातात. यावर्षी आतापर्यंत उपलब्ध झालेल्या निधींपैकी 72 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे. तर आदिवासी विकास विभागामार्फत अनुसूचित जमाती घटक कार्यक्रमासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीपैकी 80 टक्के निधी खर्च करण्यात आला आहे.
औरंगाबाद येथील शासकीय निवासी वसतिगृहामध्ये लिप्ट कार्यान्वित करण्याच्या सूचना विभागाला देण्यात येतील. याशिवाय विभागामार्फत देण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजना आणि ‘स्वाधार’ योजनेत काही अनियमितता झाली असल्याचे दिसून आल्यास याबाबतही आयुक्तांमार्फत तपासणी करण्यात येईल, असेही मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.