कस्तुरचंद पार्कवर प्रजासत्ताक दिन कार्यक्रमाची रंगीत तालीम

पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार ध्वजारोहण

नागपूर : येथील कस्तुरचंद पार्क येथे होणाऱ्या प्रजासत्ताक दिन शासकीय कार्यक्रमाची आज रंगीत तालीम घेण्यात आली. उपमुख्यमंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण होणार आहे.

रंगीत तालमीसाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, अतिरिक्त पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, उपायुक्त प्रदीप कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी डॅा. शिल्पा खारपकर यांच्यासह पोलिस व महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्य राखीव पोलिस बल गट क्र. 4, नागपूर शहर पोलिस सशस्त्र पथक, नागपूर ग्रामीण पोलिस पथक, नागपूर शहर महिला पोलिस आदी पथके प्रजासत्ताक दिन कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. यासोबत शालेय विद्यार्थीही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे चित्ररथ असणार आहे. मान्यवरांच्या हस्ते शहीद जवानांच्या वारसांना व अपंग जवानांना ताम्रपट, स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

सर्वसामान्यांच्या सोयीसाठी या कार्यक्रमाचे समाज माध्यमांवर प्रसारण केले जाणार आहे. त्याची लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

26 जानेवारीला सायंकाळी डॅा. वसंतराव देशपांडे सभागृहात शाळांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून या देशभक्तीपर कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Email Us for News or Artical - [email protected]
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com