नागपूर : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवारी (ता.23) 3 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 22 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रतिबंधित प्लास्टिक पिशवी संदर्भात 1 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 5,000/- रुपयांचा दंड वसूल करण्यात आला तसेच 2 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.उपद्रव शोध पथकाने प्लास्टिक पिशवीच्या वापराबद्दल सतरंजीपूरा झोन अंतर्गत राऊत चौक, इतवारी येथील माया स्विटस यांच्याविरुध्द कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
त्याचप्रमाणे धंतोली झोन अंतर्गत नरेन्द्रनगर येथील श्रीनिवास रेसिडेन्सी यांच्याविरुध्द रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. लकडगंज झोन अंतर्गत उपरे ले-आऊट, नेताजी नगर येथील जय जलाराम टयुशन क्लासेस यांच्याविरुध्द विनापरवानगीने विद्युत खांबावर डिस्प्ले बॅनर / होर्डिंग लावल्याबद्दल कारवाई करून 7 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.