रामटेक :- रामटेक पोलीस स्टेशन हद्दीमधील तथा मौदा रोडवरील चाचेर ते हनुमान नगर शिवारात संघपाल नितनवरे या 23 वर्षीय तरुणाचा मृतदेह 3 तारखेला सकाळी आढळून आला.त्याचे मूळ गाव बोरी(राणी)ता .पारशिवनी हे असुन संगपाल याचा मृतदेह ओळखीच्या व्यक्तीस नजरेस पडल्यावर त्यांनी घरच्यांशी तातडीने संपर्क केला.
मृतकाचे वडील व नातेवाईक हुडकेश्वर नागपूर व खर्डा (ता.मौदा) येथे मयतीला गेलेले होते.घटनेची माहिती मिळताच रामटेक पोलीस व नातेवाईक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी मृतक संघपाल रोडच्या कडेला मृत अवस्थेत पडलेला होता. त्याचा चेहरा रक्ताने माखलेला दिसत होता. तसेच त्याच्या पोट, पाय, हात व गुप्त अंगावर मारहानीच्या जखमा दिसत होत्या. मृतकाचे वडील दत्तूजी नितनवरे यांनी माझ्या मुलाचा खून केलेला असून आरोपीना तातडीने पकडण्याची मागणी पोलीस तक्रारीत केलेली आहे. रामटेक पोलिसांनी मृतदेह उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे दाखल केला असून पोलीस उपविभागीय अधिकारी आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमाोद मक्केश्वर पोलीस निरीक्षक पुढील तपास करीत आहेत.